Crime News: पुण्यात नोकरी करणारी २४ वर्षाची तरुणी गावी निघाली. तिने पुण्यावरून सांगलीला जाणारी शिवशाही बस पकडली. बस सांगलीच्या दिशेने निघाली. पण, तरुणीच्या बाजूला बसलेल्या तरुणाची नियत ढळली. रात्रीची वेळ आणि बसमधील प्रवाशांना झोपेची गुंगी येत असतानाच त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. तिने हिंमत करून हा प्रकार बसच्या वाहक आणि चालकाला सांगितला. या प्रकाराची बसमध्ये वाच्यता झाली. प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि पुढील घटना टळली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तरुणीसोबत अश्लील चाळे करणारा कोण?
पोलिसांनी ज्याला अटक केली आहे, त्या आरोपीचे नाव वैभव वसंत कांबळे (वय ३४, रा. दुधारी मारुती मंदिराजवळ, वाळवा) असे आहे. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्याला बसमधील प्रवाशांनीही बेदम चोप दिला.
तरुणीसोबत शिवशाही बसमध्ये काय घडलं?
शिरोळ तालुक्यातील ही २४ वर्षीय तरुणी पुण्यात नोकरीमुळे राहते. बुधवारी ती स्वारगेट ते सांगली शिवशाही बसमधून सांगलीला येत होती. आरोपी वैभव कांबळे हादेखील बसमध्ये होता.
हा प्रकार बुधवारी (५ मार्च) रात्री अकरा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आष्टा ते सांगलीदरम्यान घडला, असे पोलिसांनी सांगितले. शिवशाही बस रात्री ११ वाजता आष्टा बसस्थानकातून बाहेर पडली आणि सांगलीकडे निघाली. त्यानंतर आरोपी कांबळेने खिडकीजवळून तसेच सीटच्या मधून हात काढून तरुणील स्पर्श केला.
प्रवाशांनी आरोपीला दिला चोप
तो तिथेच थांबला नाही, तर अश्लील चाळे करू लागला. बस सांगली स्थानकात येईपर्यंत तरुणी शांत बसली. त्यानंतर तिने हा प्रकार बसचालकासह प्रवाशांना सांगितला. त्यानंतर संतापलेल्या प्रवाशांनी तरुणाला तिथेच चोप दिला.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत प्रवाशांच्या तावडीतून वैभवला ताब्यात घेतले. तरुणीने फिर्याद दिल्यावर वैभव कांबळे याच्यावर गुन्हा नोंद झाला आणि अटकेची कारवाई करण्यात आली.