लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये ४५ रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. सध्या २४५ रुग्णांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत ३९८ रुग्णांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, मागील सात दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका १६ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्क राहून गर्दी टाळावी तसेच मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून बिनधास्त फिरताना दिसून येत आहे.जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे. सध्या २४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १३ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा प्रशासनाने आटोरिक्षा तसेच बस चालकांनाही निर्देश दिले आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा प्रत्येक नागरिकांनी नियमित वापर करावा. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी