- मनोज ताजने
गडचिरोली : गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याला नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख देणाऱ्या नक्षल चळवळीला सरत्या वर्षाने मोठा हादरा दिला आहे. या वर्षभरात पोलिसांशी झालेल्या चकमकींमध्ये ४९ नक्षलवाद्यांना प्राणाला मुकावे लागले. वर्षभरापूर्वी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या एकूण नक्षलवाद्यांपैकी २५ टक्के नक्षलवादी यावर्षीच्या चकमकींमध्ये संपल्याचे दिसून येते. पोलिसांच्या आक्रमकतेपुढे हतबल होत असलेल्या नक्षलींच्या या चळवळीला यामुळे उतरती कळा लागली आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये १५ चकमकी झाल्या. त्यापैकी १० चकमकींमध्ये नक्षल्यांच्या जीविताचे नुकसान झाले नाही. मात्र पाच चकमकींमध्ये त्यांना मोठे नुकसान झाले. १३ नोव्हेंबरला झालेली मर्दिनटोला जंगलातील चकमक ऐतिहासिक ठरली. या चकमकीत पोलिसांच्या सी-६० कमांडोंनी तब्बल २७ नक्षलवाद्यांचा वेध घेतला. २०१८ नंतरची ही सर्वांत मोठी चकमक ठरली.
याच वर्षात २१ मे रोजी पैदीच्या जंगलात उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात १ डीव्हीसीएम, ३ एसीएम आणि १ पीपीसीएम यांचा समावेश होता. जिल्ह्यात आता जेमतेम दीडशेच्या घरात नक्षली शिल्लक राहिले आहेत.
२० अटकेतवर्षभरात पोलिसांनी २० नक्षलवाद्यांना अटक केली. त्यात काही महिला सदस्यांचाही समावेश आहे. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनुसार शस्त्र खाली ठेवून चळवळीतून बाहेर येण्याचे आवाहन पोलिसांनी वारंवार केल्यानंतरही काही नक्षलवादी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकले. त्यांच्यावर आता न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे.
मिलिंद तेलतुंबडेची दहशत संपलीतीन दशकांपासून नक्षल चळवळीत सक्रिय राहून आपली दहशत निर्माण करणारा मिलिंद तेलतुंबडे हा नक्षल नेता १३ नोव्हेंबरच्या चकमकीत ठार झाला. नक्षलींविरोधी अभियानातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या तेलतुंबडेवर महाराष्ट्र शासनाने ५० लाखांचे बक्षीस ठेवले होते. त्याच्या मृत्यूमुळे नक्षली दहशतही बऱ्याच प्रमाणात कमी झाली.
प्रमुख पाच चकमकीदि. ठिकाण मृत नक्षली२९ मार्च खोब्रामेंढा जंगल ५ २८ एप्रिल गोरगट्टा जंगल २ १३ मे मोरचुल जंगल २ २१ मे पैदी जंगल १३ १३ नोव्हें. मर्दिनटोला जंगल २७