ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - अश्लील व्हिडिओ आणि बनावट फोटो तयार करुन सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी येथील एका अभिनेत्रीने गुगल व यु टयुबवर २५ कोटी रुपयांचा दावा बुधवारी दाखल केला आहे.
पुण्यात राहणा-या या अभिनेत्रीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयामधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. ही अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करीत असून तिचे भरपूर व्हिडिओ यु ट्युब व गुगलवर अपलोड करण्यात आले असून या व्हिडिओच्या माध्यमातून तिला शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. तसेच, तिची कलाकाराची बनलेली छबी तोडण्याचा प्रयत्न व मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याचबरोबर, माझी प्रतिमा मलिन करुन गुगल आणि यु ट्युबने २ कोटी ८० लाख रुपये आतापर्यंत कमावले आहेत, असे या अभिनेत्रीने न्यायालयात केलेल्या दाव्यात म्हटले आहे.
याबाबत तिने तक्रार केली असता तिच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही़. हे वादग्रस्त व्हिडिओ व फोटो संपूर्ण जगभरात प्रदर्शित केले गेले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईपोटी २५ कोटी रुपये मिळायला हवेत, असेही तिने यामध्ये म्हटले आहे़