ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - ओला, उबर या अॅप बेस टॅक्सी सेवांच्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी आता काळया-पिवळया टॅक्सीनेही कंबर कसली आहे. नवी मुंबईतील काळया-पिवळया टॅक्सी चालकांनी मुंबई-नवी मुंबई प्रवासासाठी घसघशीत सवलत जाहीर केली आहे.
काळया-पिवळया टॅक्सीच्या '९२११ कॅब' या अॅपवरुन किंवा कॉल सेंटरमार्फत टॅक्सी बुक करणा-या प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. विविध टॅक्सी युनियनच्या वतीने हे अॅप चालवणा-या आयटी कंपनीने सवलत जाहीर केली आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवासासाठी २५ टक्के तर, नवी मुंबई ते मुंबई प्रवासासाठी १० टक्के सवलत मिळणार आहे.
या सवलतीमध्ये टोलचा समावेश नाही. टोलचे पैसे प्रवाशांनाच भरावे लागणार आहेत. काळी-पिवळी टॅक्सी ९२११ कॅब या मोबाईल अॅपवरुन किंवा ०२२-४००२९२११ या क्रमांकावर फोन करुन किंवा ७०२१७१८२६० या व्हॉटस अॅप नंबरवर संदेश पाठवून टॅक्सी बुक करता येईल.
बांद्रा आणि बीकेसीमध्ये प्रयोग केल्यानंतर काळया-पिवळया टॅक्सी चालकांनी सवलतीचा हा प्रयोग केला आहे. आजपासून ही सवलत सुरु झाली आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या मध्ये काही बदल होऊ शकतात. ओला, उबर या टॅक्सींमुळे काळे-पिवळे टॅक्सी चालक चांगलेच जेरीस आले आहेत.
त्यांना लांब पल्ल्याची भाडी मिळणे बंद झाले आहे. ओला-उबर टॅक्सीमध्ये वातानुकुलित आरामदायक प्रवास असतो. त्यामुळे ग्राहकदेखील चार पैसे जास्त मोजावे लागले तरी, ओला-उबरला प्राधान्य देतात. त्यामुळे वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून रहाण्यासाठी काळया-पिवळया टॅक्सीचे चालक आता सवलतीचा नवा प्रयोग करत आहेत.