मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश १०० टक्के आॅनलाइन पद्धतीनेच देण्याचे आदेश या वेळी उच्च न्यायालयाने दिले आहेत. आॅनलाइन प्रवेशामुळे न्याय्य प्रवेश मिळणार असले, तरी सहा फेऱ्यांनंतरही प्रवेश मिळालेले विद्यार्थी नाखूश असल्याचे चित्र आहे. शिवाय अद्यापही कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या सुमारे २५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश आॅनलाइनने होत आहेत. त्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, मीरा-भार्इंदर महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल नगरपालिका, ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. महानगर क्षेत्रात कला शाखेची २८७, वाणिज्यची ७६४ आणि विज्ञान शाखेची ५०४ अशी एकूण १ हजार ५५५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात कला शाखेसाठी ३५ हजार २६९, वाणिज्यसाठी १ लाख ५७ हजार ६२२ आणि विज्ञान शाखेसाठी ८५ हजार ३३१ जागा उपलब्ध आहेत. या एकूण २ लाख ७८ हजार २२२ जागांसाठी आॅनलाइनच्या पाच गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या. त्यानंतरही प्रवेश बदल करण्यासाठी एक विशेष फेरी घेण्यात आली. मात्र, या सहा फेऱ्यांनंतरही एकूण २ लाख २ हजार ८६८ जागांवर प्रवेश घेण्यात आले आहेत, तर एकूण ७५ हजार ३५४ जागा अद्याप रिक्त आहेत. (प्रतिनिधी)>अनेकांना हवे आहेत प्रवेशबदलअकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. मात्र, प्रवेश बदल करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या पहिल्या विशेष फेरीत सुमारे ६७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलण्याचा प्रयत्न केला, तर सुमारे ४४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशात बदल केला. त्यानंतर, दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश बदल करण्यासाठी आणि नव्याने प्रवेश घेण्यासाठी शनिवारपर्यंत २४ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थी मिळालेल्या प्रवेशाबद्दल नाखूश असल्याचे दिसते. परिणामी, अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन समाधानी करताना, रिक्त जागा भरण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.नियम उल्लंघनप्रकरणी जयहिंदची चौकशी अकरावी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये शुल्क भरताना जयहिंद महाविद्यालयाने स्क्रॅच कार्ड प्रणालीचा उपयोग केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जयहिंद महाविद्यालयावर फौजदारी गुन्हा दाखल करत चौकशी करण्यात यावी, असे आदेश शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिले आहेत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश शुल्क भरताना ‘स्क्रॅच कार्ड’ प्रणालीचा उपयोग केला. ही प्रक्रिया नियमांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले. या प्रकरणाचा पाठपुरावा मनविसेने केला. शिवाय ही बाब शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत, महाविद्यालयाची सखोल चौकशी व स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अकरावीच्या २५% जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 5:35 AM