मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भांडुपमध्ये तब्बल 25 लाखांची बेहिशेबी रोकड पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजीच्या पिशवीतून या रकमेची तस्करी करताना तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी शौकत अली मेहबुब अली खान (6क्), इनामुल हसन शौकत अली खान (32) आणि रामप्रसाद यादव (36) या तिघांना ताब्यात घेतले आहे. 41(ड)सीआरपीसी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यादवकडेही तपास सुरू आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास या त्रिकूटाने भांडुप सोनापूर येथून रिक्षा पकडली. त्याचदरम्यान भांडुप एलबीएस मार्गावरून हे त्रिकूट जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नितीन गिजे यांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ 7चे डीसीपी डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गिजे यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास भांडुप एलबीएस मार्गावरून त्रिकूटाची रिक्षा जाणार तोच पोलिसांनी त्यांना अडविले. या वेळी गिजे यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, अशोक बाबर आणि राजू भांबरे या पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी तिघांच्याही संशयित हालचालींमुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला. त्यांच्याकडे असलेल्या तीन भाज्यांच्या पिशव्यांपैकी एका पिशवीमध्ये भाज्यांखाली लपवलेले पैसे पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी तिघांनाही भांडुप पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे तिघेही भांडुप सोनापूर येथे राहणारे असून, शौकत अली खान हा प्लंबर आहे. तर इनामुल आणि यादव हे ईस्टेट एजंट म्हणून काम करतात. गोरेगाव येथे गाळा खरेदी केला असून, त्याचेच पैसे देण्याकरिता जात असल्याचा दावा त्रिकूटाने केला आहे. मात्र या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप
चव्हाण यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात एवढय़ा मोठय़ा स्वरूपात सापडलेल्या रकमेमागे एखाद्या राजकीय पक्षाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
च्पैशांची शहानिशा करण्यासाठी निवडणूक अधिका:यांसह आयकर विभागाचे अधिकारीही त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. त्यामुळे या प्रकाराचा लवकर छडा लावावा अशी मागणी होत आहे.