- स्वागताध्यक्षांचा निर्णय: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी
विश्वास मोरे/ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून मिळालेला 25 लाख रुपयांचा निधी आयोजक असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने परत केला आहे. हा निधी साहित्य महामंडळाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वापरावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता सोमवारी झाली. साहित्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद आणि सुनियोजनाने हे संमेलन आगळेवेगळे ठरले. श्रीमंती थाटाचे संमेलन अशी टीका झाली; मात्र शासनाकडून मिळालेला निधी परत करून आणि ‘नाम’ फाउंडेशनला 1 कोटीची मदत देऊन संयोजक डॉ. पाटील यांनी या टिकेला कृतीशील उत्तर दिले.
डॉ. म्हणाले, साहित्य संमेलनाच्या संयोजनासाठी राज्य सरकारने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. तो महामंडळाने संयोजक म्हणून आम्हाला दिला होता. परंतु, आम्ही तो महामंडळाला परत करणार असून, त्याचा उपयोग मराठी भाषेच्या संवर्धनासाठी करावा, अशी अपेक्षा आहे. ग्रंथप्रदर्शन आणि विक्रीला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाल्याची नोंद झाली आहे. पहिल्या तीन दिवसांतच सुमारे चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. ग्रंथदालनातून 22 लाख उत्पन्न मिळाले. त्यात 78 लाख रुपयांची भर टाकून एक कोटी रुपयांचा निधी ‘नाम फाउंडेशन’ला दिला आहे. अशा प्रकारे संमेलनातून सामाजिक भान राखल्याचेही समाधान डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.