- पराग मगरवर्धा, दि. ४ - कुठलीही जीवितहानी झाल्याशिवाय उपाययोजना न करणे ही नित्याची बाब झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटनाही त्याचेच द्योतक आहे. वर्धा जिल्ह्यातही जवळपास २५ पुलांनी शंभरी गाठली आहे. पुलगाव येथील रेल्वे पूल तर १५० वर्षे जुना आहे. पर्यायी व्यवस्था करून नवीन पूल बांधले असले तरी जुन्या पुलांवरून काही प्रमाणात वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे या पुलांचे सरकार आता काय करणार, की दुसरी दुर्घटना घडल्यावरच एजबार झालेले पूल पाडले जाणार हा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यातील सर्वाधिक विदारक स्थिती ही आष्टी(शहीद) तालुक्याची आहे. या तालुक्यातील तब्बल सहा पुलांनी शंभरी पार केली आहे.
यामध्ये नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खडका पूल, आष्टी-साहूर द्रूगवाडा राज्यमार्ग क्र. २४४ वरील पूल, आष्टी-मोर्शी रस्त्यावर अप्पर वर्धा धरणासमोरील पूल, आष्टी परसोडा मार्गावर लेंडी नदीवरील पूल, आष्टी-साहूर मार्गावर धाडी गावापूर्वी असलेला जामचा पूल आणि आष्टी-परसोडा मार्गावरील अन्य एक पूल या सहा पुलांनी शंभरी गाठली आहे. तर २४ लहान पुल हे अखेरच्या घटना मोजत आहेत. यातील काही पुलांचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येते.
त्याचप्रमाणे वर्धा-नागपूर राज्य महामार्गावर पवनार या गावी धाम नदीवर असलेल्या पुलानेही शंभरी पार केली आहे. येथे पर्यायी मोठा पूल बांधला असला तरी या मार्गावरूनही किरकोळ वाहतूक होते. त्यातच सदर पूल सेवाग्राम आश्रमला जोडणारा असल्याने त्याचे वेगळे महत्वही आहे. याच मार्गावर सेलू येथे बोरा नदीवरील लहान पूलही शंभर वर्षांचा झाला आहे. येथेही नवीन पूल बांधण्यात आला असला तरी लहान पुलावरून किरकोळ वाहतूक होते. कारंजा तालुक्यातील जवळपास १५ पूल हे जीर्णावस्थेत आहेत. यातील अनेकांच्या मुदती संपल्या आहेत, तर काही पूल पूर्णत: ढासळून अपघातास निमंत्रण देत आहेत.
पुलगाव येथील १५० वर्षांचा रेल्वे पूल जीवघेणाब्रिटीश राजवटीत मुंबई हावडा ही देशातील दोन मोठी शहर रेल्वे, मार्गाने जोडून दळणवळणाचा मार्ग सुकर करावा या भावनेतून रेल्वे मार्ग उभारण्यात आला. या मार्गावर वर्धा नदीवर पुलगाव येथे १८६५ रोजी रेल्वेपूल उभारण्यात आला. या पुलाला १५० वर्षे झाली आहेत. दररोज सतत रेल्वे गाड्यांचा भार सहन करीत आहे. दररोज शेकडो गाड्या या पुलावरून धावतात. सदर पूल कालबाह्य झाल्याचे पत्रही ब्रिटिश शासनाने भारत सरकारला पाठविले आहे. या संदर्भात 'लोकमत'ने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या बातम्यांमुळे काही महिन्यांपूर्वीच या पुलाची दुरूस्ती करण्यात आली आहे. तरीही सदर पूल धोक्याचा असून येथे दुसरा समांतर पूल बांधणे गरजेचे झाले आहे.