लोणी काळभोर : हवेलीतील तब्बल तेवीस लाभार्थी शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवीन विहिरीच्या कामाच्या नावाखाली सरकारचे शासकीय अनुदान लुबाडणाऱ्या‘लाभार्थी’च्या सातबारा उताऱ्यावर अपहार केलेल्या रकमेचा बोजा व्याजासह दाखल करण्याचे पत्र तलाठी कार्यालयास प्राप्त झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून, खळबळ उडाली आहे.‘न खोदलेल्या विहिरीची चोरी’ या विषयावर काही वर्षांपूर्वी ‘कायद्याचं बोला’ हा मराठी चित्रपट आला होता. या चित्रपटातील नायक आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगावण्यासाठी भ्रष्ट शासन व्यवस्थेला हाताशी धरून शेतीत न खोदलेली विहीर खोदली होती. हे सिद्ध करून आपली विहीरच चोरीला गेल्याची बतावणी करतो. असाच काहीसा प्रकार हवेली तालुक्यात झाला आहे.यामध्ये तालुक्यात फुरसुंगीमधील चार, आळंदी म्हातोबाचीमधील पाच, सांगवी सांडस गावातील चार, व लोणी काळभोर, लोणीकंद, वाघोली, भावडी, भिवरी, तरडे, वाडेबोल्हाई, कल्याण व पिंपरी सांडस मधील प्रत्येकी एका शेतकऱ्यांनी नवीन विहीर खोदण्याच्या नावाखाली योजनेअंतर्गत पैसे घेऊन विहीर आजअखेर न खोदता अग्रीम रक्कम हडप करून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. छोटे पाटबंधारे विभाग हवेलीमधील काही अधिकाऱ्यांचा हात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने माहिती घेण्यासाठी गेलेल्या वार्ताहरांना वरिष्ठांचा नंबर देण्यास नकार दिला. लाभार्थींना अनुदानाचे वाटप करण्यात आल्यानंतर छोटे पाटबंधारे उपविभाग हवेली या कार्यालयाकडून संबंधितांनी विहीर खोदाईचे काम सुरू करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलेला आहे; परंतु अग्रीम रक्कम मिळूनही तब्बल पाच वर्षांत लाभार्थींनी विहिरीचे काम सुरू केले नाही. (वार्ताहर)
हवेलीतील २५ विहिरी चोरीला
By admin | Published: July 07, 2015 3:23 AM