मुंबई : महानगरातील सुरक्षित परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलेपार्लेतील राष्ट्रीय (डोमेस्टिक) विमानतळ परिसरातून बंदुकीचा धाक दाखवून, भरदिवसा अडीच कोटींचे सोन्याचे दागिने लुटण्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. विलेपार्लेतील जय मातादी कुरियर कंपनीच्या नावे हैदराबाद व बंगळुरू येथून सोन्याच्या दागिन्याचे पार्सल सकाळी मुंबई जेट एअरवेजच्या विमानातून आले होते. साडेदहाच्या सुमारास कुरियर बॉय महेंदकुमार सानी (वय २३) व त्याचा सहकारी राजू यांनी विमानतळावर जाऊन दागिन्याचे पार्सल ताब्यात घेतले. बॅगेत ठेवून ते पार्लेतील श्रद्धानंद रोडवरील कल्याणी अपार्टमेंटजवळील संबंधित सराफ व्यावसायिकाकडे पोहोचविण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले. पार्ले पुलाजवळ मोटारसायकलसमोर कार आडवी लावून पाच जणांनी त्यांना अडविले. त्यातील एका तरुणाने महेंद्रकुमारच्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर लावली. आपण क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी असल्याचे सांगून, त्यांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील बॅग काढून घेतली. जोगेश्वरीजवळ निर्जन ठिकाणी गाडी थांबवून त्यांना खाली उतरविले. तेथून एक्सप्रेस हायवेच्या दिशेने गाडी सुसाट पळविली. त्यानंतर घाबरलेल्या दोघांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. शहरात नाकाबंदीया प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लुटारूंचा शोध घेण्यासाठी शहर व उपनगरात नाकाबंदी करण्यात आली असून, तीन पथकेही पाठविण्यात आली आहेत.लुटारू हे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, प्रत्येकाकडे रिव्हॉल्व्हर होती. त्यातील काही जण हिंदीत तर एकटा मराठीत बोलत होता, असे कुरियर बॉयने सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार संशयिताचे रेखाचित्र बनवण्यात येत आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपाासण्यात येत आहे. कुरियर कंपनीकडे असलेली दागिन्यांची माहिती लुटारूपर्यंत कशी पोहोचली, याबाबत दोघा कुरियर बॉइजकडे चौकशी केली जात आहे.
भरदिवसा लुटले अडीच कोटींचे दागिने
By admin | Published: October 22, 2015 2:05 AM