ऑनलाइन लोकमत
मुंबई - राज्य शासनाच्या "हरीत महाराष्ट्र" अभियानात शुक्रवारी कौशल्य विकास विभागाच्या राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक माध्यमिक शाळा सामील होत आहेत. परिणामी,आज प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांमागे एक झाड याप्रमाणे 2.50 लाख वृक्ष लागवड होणार आहे.
याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभाग राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गुरूवारी बैठक घेतली. यामध्ये संचालक दयानंद मेश्राम, सहसंचालक अ.म.जाधव, उपसंचालक योगेश पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी विजय महाजन उपस्थित होते. या अभियानाची सुरवात मंत्री महोदय यांच्या हस्ते अकोला व वाशिम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वृक्षारोपन करुन होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत लागवड करण्यांत आलेल्या सर्व रोपांचे वृक्षात परीवर्तन होण्यांसाठी त्यांचे संवर्धन व संगोपन करण्यांसाठी अनुसरावयाची प्रमाणित कार्यपध्दती संचालनालयामार्फत यापुर्वीच राज्यतील सर्व शासकीय तथा खाजगी औ.प्र.संस्थांना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमांतर्गत लागवड करण्यांत आलेल्या वृक्षांना आवश्यक तो पाणीपुरवठा हा ठिंबक सिंचनाव्दारे करण्यांत येणार असून याकामी औद्योगिक आस्थापना, सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेण्यांत येणार आहे. संस्थांत कार्यरत असणारे शिल्पनिदेशक / गटनिदेशक यापैकी सक्षम कर्मचाऱ्यांची "वृक्षमित्र" म्हणुन निवड करण्यांत येवुन प्रादेशिक कार्यालय स्तरावर "वृक्षमित्र समन्वय" निवडून संबंधितांवर जबाबदारी सोपविण्यांत येणार आहे.
राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्र माध्यमिक शाळांच्या आवारात सद्यस्थितीत स्थापित असलेल्या वृक्षांची नोंदणी करुन त्याप्रमाणे नविन वृक्षांची लागवड करुन जोपासना करता येईल या पध्दतीने जागा निवडून पुढील कार्यवाही करण्यांचे निर्देश देण्यांत आलेले आहेत. सदर कार्यवाही करताना स्थानिक वातावरणात वृक्षांची योग्य प्रकारे वाढ होऊल ही बाब देखील विचारात घेवून वृक्षांची निवड करण्यांत येत आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जड संग्रह नोंदवही (Dead Stock Register) प्रमाणे Tree Inventery Register तयार करण्यांत येवून सदर नोंदवही संस्थाप्रमुखांच्या कार्यलयात ठेऊन त्यामध्ये संस्थेच्या आवारात असलेल्या वृक्षांची नोंद घेतली जाणार आहे.