मालवण : आचरा बंदरात मिनी पर्ससीनचा वापर करणारे व पारंपरिक मच्छीमार यांच्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार चकमकीप्रकरणी आचरा पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे, तर अन्य २०० ते २५० मच्छीमारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्य संशयित मच्छीमारांचा शोध सुरू असून, काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आचरा येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण होते.दरम्यान, रिहान युसूफ मुजावर (आचरा-जामडूलवाडी) यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गैरकायदा जमाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा करून गंभीर दुखापतीस कारणीभूत, तसेच घरात घुसून मारहाण व तोडफोड करीत किनाऱ्यावरील बोटी, जाळी पेटवून दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात शनिवारी रात्री उशिरा हर्षद चोडणेकर (२७, तोंडवळी), परशुराम प्रभू (३३, तोंडवळी), धनाजी कुमठेकर (४१, आचरा पिरावाडी), अमित हुर्णेकर (४०, वायरी-मालवण), अशोक कांदळगावकर (५०, आचरा पिरावाडी) यांना अटक केली आहे. शनिवारी सायंकाळी, पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी जमाव केला. जमावाने दांडे, लोखंडी शिगा, बर्फ भरायचे लोखंडी खोरे, दगड, आदींनी हल्ला केला. यात सकलीन मुजावर, अबुवकर मुजावर, शाईन मुजावर, इम्रान काझी व महिला, कामगार जखमी झाले. ‘राडा’ रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाने जखमी केले. अर्ध्या तासाच्या या चकमकीत सुमारे ५० लाखांहून अधिक किमती सामानाचे नुकसान झाले असल्याचे मुजावर यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
मालवणमधील राडाप्रकरणी २५0 जणांवर गुन्हे
By admin | Published: November 02, 2015 3:00 AM