नवी मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सिडको व महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईला गती दिली आहे. त्यानुसार मंगळवारी एपीएमसीतील सुमारे २५० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच परिसरात उभारलेल्या बेकायदा गोदामावरही कारवाई केली.एपीएमसी परिसरातील सेक्टर १९ येथील प्लॉट क्रमांक २६ व २७ वर सुमारे दोनशे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे याआधीही झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु कालांतराने त्या पुन्हा उभारल्या होत्या. त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मंगळवारी महापालिकेच्या सहाय्याने या झोपड्यांवर कारवाई केली. यावेळी याच परिसरातील ८००० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर उभारलेल्या बेकायदा गोदामावरही हातोडा मारण्यात आला. सेक्टर २६ येथे रेल्वे मार्गाच्या लगत उभारलेल्या सुमारे ५० झोपड्याही पाडण्यात आल्या. सिडकोचे मुख्य अनधिकृत बांधकाम नियंत्रक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन पोकलेन, दोन जेसीबी, एक ट्रक, सहा जीप आदी साधनसामग्रीसह सुमारे २० कर्मचारी कारवाईसाठी उपलब्ध करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
२५० झोपड्या जमीनदोस्त
By admin | Published: October 19, 2016 3:18 AM