औरंगाबाद : राज्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागणार आहेत. बहुसंख्य प्रकल्पांची निम्मापेक्षा अधिक कामे पूर्ण झाली; परंतु हे प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सरकारने परदेशी बँकांकडून कर्ज, कर्जरोखे उभारणे आणि मोठे ठेकेदार, सरकार व बँकांशी करार करून २५ हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार सुरू केला आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांचा महाजन यांनी सोमवारी आढावा घेतला. बैठकीनंतर महाजन म्हणाले, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १३ लाख ४६ हजार कोटींची आवश्यकता असून, या वर्षी केवळ ९२२ कोटींची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. राज्यातील प्रकल्पांसाठी केवळ ७ हजार २०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. निधीची तरतूद नसल्याने कामे प्रलंबित आहेत. परिणामी, कि मती पाच पटींनी वाढल्या आहेत. सिंचन क्षेत्रातील अनुशेष दूर करण्यासाठी आणि मराठवाड्याला १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प हाती घेण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले आहेत, असे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘कर्जरोख्यांद्वारे २५ हजार कोटी उभारणार’
By admin | Published: August 25, 2015 2:09 AM