मुंबई : याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासूनच तब्बल २५ हजार पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. शहरातील तब्बल २०० संवेदनशील ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात असतील, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तालयातून मिळाली.याकुबला फाशी दिल्यास त्याच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी होईल, ही शक्यता डोळ््यांसमोर ठेवूनच मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठीची व्यूहरचना आखल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याकुबच्या अंत्ययात्रेचे निमित्त साधून दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे किंवा दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न घडू शकतात, असा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे काही दिवसांपासूनच पोलिसांनी शहरात सर्वत्र प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून या कारवाईला आणखी वेग येणार असल्याचे संकेत आयुक्तालयातून मिळाले आहेत. दुसरीकडे पोलिसांनी स्थानिक धर्मगुरूंच्या बैठका घेऊन संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणांची यादी तयार केली आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल व शीघ्र कृती दलाचे सशस्त्र जवान तैनात असतील, असे पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. शहरात जमावबंदी : मुंबईत ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र परिस्थिती लक्षात घेता, पोलीस ही बंदी पुढील दोन आठवड्यांसाठी वाढवू शकतात. जमावबंदीत अंत्ययात्रा काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र याकुबचे प्रकरण विशेष असल्याने मेमन कुटुंबाला अंत्ययात्रा काढताना पोलिसांशी चर्चा करावी लागेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.मेमन -पोलीस चर्चा : याकुबचा मृतदेह ताब्यात मिळावा, मरिन लाईन्सच्या बडा कब्रस्तानात याकुबवर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा मेमन कुटुंबियांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे. तर पोलिसांनी याकुबवर नागपूर कारागृहातच अंत्यसंस्कार करण्याबाबत कुटुंबाशी चर्चा केल्याचे समजते. तसेच याकुबचा मृतदेह ताब्यात दिल्यास माहिममध्येच अंत्यसंस्कार करा, अशीही सूचना पोलिसांनी मेमन कुटुंबाला केल्याचे समजते.विमानतळ, धारावीत विशेष बंदोबस्तमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारावी आणि वांद्रयाच्या पालीहिल परिसरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी या तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी माहिती गुप्तहेर संघटनांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. अफवा पसरवू नका, विश्वास ठेवू नका : अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती करू नका, असे मुंबईकरांना आवाहन आहे. तसे झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. मुंबईत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत. - देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)संमिश्र प्रतिक्रियायाकूब मेमनच्या डेथ वॉरंटला आव्हान देणारी याचिका फेटाळण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाजपाने स्वागत तर भाकपने विरोध दर्शविला आहे. हा आंशिक न्याय आहे, याकूबचा भाऊ टायगर मेमन याला सरकारने पाकिस्तानातून परत आणून शिक्षा ठोठावली असती तर पूर्ण न्याय झाला असता,असे काँग्रेसने म्हटले. बॉम्बस्फोट मालिकेत २५७ लोक मारले गेले तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. हजारो कुटुंब आजही या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आणि सन्मान करतो, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले. आमचा न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास असून बुधवारच्या निर्णयामुळे तो आणखी बळकट झाला आहे. मेमन याला मानसिक आजार असल्यामुळे उपचाराची गरज असल्याचे सांगत किंवा धार्मिक आधार देत जातीय रंग देण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्यच होता हे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने स्पष्ट झाले आहे, असे भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी म्हटले. १९९३ च्या बॉम्बस्फोट पीडितांसाठी हा मोठा दिवस ठरला. त्यामुळे न्याय मिळाल्याची भावना बळकट झाली असून हा कायद्याचा विजय आहे, असे भाजपचे अन्य प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले.(वृत्तसंस्था)
मुंबईत २५ हजार पोलीस तैनात
By admin | Published: July 30, 2015 2:37 AM