मुंबई: महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले होते. मात्र आता आरबीआयने ग्राहकांना 25 हजार रुपये काढण्याची मुभा दिल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. आरबीआयने सुरुवातीला बँकेतून खातेधारकांना केवळ 1 हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती. त्यानंतर ही मुभा वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली होती. मात्र आता आरबीआयकडून सहा महिन्यात 25 हजार रुपये काढण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली आहे.
पीएमसी बँक ही अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँक आहे. त्यावर निर्बंध आल्याचे वृत्त कळताच मुंबईसह राज्यातील या बँकेच्या शाखांपुढे खातेदारांनी एकच गदी केली. आपले पैसे बुडाले, असेच खातेदारांना वाटत असून, ते हडबडून गेले आहेत. रिझर्व्ह बँकेने सोमवारी परिपत्रक काढून बँकेवर निर्बंध लागू केले. रिझर्व बँकेने बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ अन्वये ही कारवाई केली होती. रिझर्व बँकेचे निर्बंध तूर्त सहा महिन्यांसाठीच असून, त्यानंतर बँकेच्या स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पीएमसी बँकेने आपल्या सर्व खातेदारांना या आर्थिक निर्बंधांची माहिती द्यावी, असेही रिझर्व बँकेने कळवले आहे.