भाऊसाहेब येवले, राहुरी (अहमदनगर) -भारतभर विविध ठिकाणी भ्रमंती करून २८४ संतांचे चरित्र लिहिणारे संतकवी महिपती महाराज यांचा एकमेव हस्तलिखित ग्रंथ श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़ राहुरी) येथे २५२ वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला आहे. ‘श्री भक्तीविजय’ असे ग्रंथाचे नाव असून ,महिपती महाराजांचे वंशज पांडुरंग कांबळे यांनी तो देवस्थान ट्रस्टकडे दिलेला आहे. १७६२मध्ये महाराजांनी लिहिलेल्या श्री भक्तीविजय ग्रंथामध्ये ५७ अध्याय असून, ९९१६ ओव्यांचा समावेश आहे़ बाजरीचे दाणे जाळून त्यापासून तयार केलेल्या शाईच्या साहाय्याने वळणदार अक्षरात ग्रंथनिर्मिती केली असल्याची माहिती संस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे यांनी दिली़ पांडुरंगाची मूर्ती समोर ठेवून महिपती महाराजांनी १५ गं्रथांची निर्मिती केली. महाराजांचे एकमेव हस्तलिखित ग्रंथ असल्याने त्याचे जतन करण्यात येणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी सांगितले. संत तुकाराम महाराजांना गुरू माणून महिपती महाराजांनी संत चरित्र लिहिण्यास सुरुवात केली़ महाराजांनी उत्तर आयुष्यात २५ वर्षांत १५ गं्रथ लिहिले़ महाराजांना मराठी, संस्कृत, गुजराती, हिंदी व कानडी या पाच भाषा अवगत होत्या़ अमेरिकन ख्रिश्चन धर्म प्रचारक एडवर्ड अॅबर्ट यांनी भक्तीविजय, भक्तलीलामृत व संतविजय या गं्रथांचे इंग्रजीत अनुवाद करून महिपती महाराजांच्या साहित्याचा प्रसार सातासमुद्रापलीकडे केला आहे़
२५२ वर्षांपूर्वीचे हस्तलिखित!
By admin | Published: January 05, 2015 4:29 AM