- बाळासाहेब बोचरे । लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : कार्यशाळेच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) सोलापूर जिल्ह्यात दोन लाखांचा घोटाळा केल्याची बाब समोर आली आहे. त्याचवेळी बार्टीने २००६ साली आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील खर्ची टाकलेल्या २५ लाख ९० हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम १० वर्षे उलटली तरी अद्याप विजेत्यांना मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्टीने शासनाला दोन लाखांचा गंडा घातल्याचे वृत्त लोकमतमध्ये ११ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच सोलापुरातील सागर उबाळे यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून बार्र्टीने २५ लाख ९० हजार रुपये कसे हडप केले याचे माहिती अधिकारात गोळा केलेले पुरावे सादर केले. बार्टीच्या वतीने एप्रिल २००६ मध्ये फुले, शाहू, आंबेडकर या विषयावर निबंध, पाठांतर, प्रश्नावली, वादविवाद, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. राज्यातील १६४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी एकूण २५ लाख ९० हजार ६०० रुपयांची एकूण बक्षिसे ठेवण्यात आली होती. यासाठी राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत २६ लाखांचा निधी दिला असताना ही रक्कम अद्याप एकाही बक्षीस विजेत्यास मिळालेली नाही. या स्पर्धेनंतर बार्टीकडून सर्व विजेत्यांना केवळ कोरी प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्यांना पाठवण्यात आली. रकमेबाबत विजेते पाठपुरावा करत राहिले पण बार्टीकडून टोलवाटोलवी झाली. त्यानंतर उबाळे यांनी माहिती अधिकारात विचारणा केली असता १८ मार्च २००६ म्हणजे स्पर्धा घेण्यापूर्वीच यशदाकडे स्पर्धेची रक्कम धनादेशाद्वारे सुपुर्द केल्याचे २५ जून २००७ रोजी एका पत्राद्वारे कळवण्यात आले. तथापि अद्याप यशदाकडून अशी रक्कम वाटण्यात आली नाही. त्यानंतर यशदाकडे माहिती मागितली असता यशदाने प्रथम केवळ २९ रुपये मागणी केली. अर्जदाराने २९ रुपयांची मनिआॅर्डर यशदाच्या नावे केली असता लवकरच माहिती पाठवली जाईल असे २८ आॅगस्ट २००७ रोजी पत्राद्वारे कळवण्यात आले. तथापि अद्याप अर्जदाराला माहिती देण्यात आलेली नाही किंवा बक्षिसाची रक्कम देण्यात आलेली नाही. आपण शासकीय कर्मचारी असल्यान त्रास देण्यास सुरुवात केली असून याबाबत मुख्यमंत्री, समाजकल्याणमंत्री व पुणे विभागीय आयुक्त यांंना निवेदन देऊन चौकशीची मागणी केल्याचे उबाळे यांनी सांगितले.२९ रुपयांची मनिआॅर्डर यशदाच्या नावे केली असता लवकरच माहिती पाठवली जाईल, असे २००७ मध्ये सांगण्यात आल़े अद्याप अर्जदाराला बक्षीस मिळाले नाही़
बार्टीकडून बक्षीस योजनेचे २५ .९० लाख रुपये गायब
By admin | Published: July 16, 2017 12:58 AM