लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : पांगरमल येथील दारूकांड प्रकरणी सीआयडीने अखेर गुरूवारी २० आरोपींविरूद्ध तब्बल २,३९६ पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. या दारूकांडात ९ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी झाले होते. पांगरमल येथे १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राजकीय नेत्यांनी दिलेल्या पार्टीत विषारी दारू पिऊन ९ जणांचा मृत्यू झाला. ही दारू येथील जिल्हा रूग्णालयाच्या कँटिनमध्ये तयार होत असल्याचे समोर आले. तसेच या विषारी दारूमुळे नेवासे तालुक्यातील १, नगर तालुक्यातील कौडगाव येथील २, तर दरेवाडी येथील २ अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर विविध सामाजिक संघटनांच्या मागणीनंतर २३ एप्रिल रोजी राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला. या प्रकरणाला १२ मे रोजी ९० दिवस पूर्ण होत असल्याने एक दिवस अगोदर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सीआयडीकडून २,३९६ पानांचे दोषारोपपत्र दाखल
By admin | Published: May 12, 2017 3:05 AM