नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरातील दोनशे विशेष केंद्रातून सरकारच्या विकास कामांची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. यासाठी भाजपच्या वतीने २६ मे ते १५ जूनपर्यंत ‘विकास पर्व’ आयोजित केले जाणार आहे. एक केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्र, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांचा समावेश असलेली ३३ पथके या विशेष केंद्रांना भेट देऊन मोदी सरकारची कामगिरीचा लेखाजोखा मांडणार आहेत.
विरोधकांनी महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग रोखत विकासाच्या मार्गात कशापद्धतीने आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच यावर मात करून दोन वर्षाच्या अल्पावधीत सरकारने लोककल्याणासोबत विकासाची काय-काय कामे केली, याचीही जनतेला माहिती दिली जाणार आहे, असे सर्व मंत्री आणि विभाग प्रमुखांंना पाठविण्यात आलेल्या अंतर्गत चिठ्ठीत म्हटले आहे.
२६ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्ववाखाली सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दोन वर्षातील सरकारची कामगिरी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. त्यानुसार सरकारच्या विविध योजनांच्या फायद्याबाबत माहिती देणे, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना, संस्थासोबत तसेच बिगरराजकीय बैठकी घेणे, शेतकरी, महिला संघटना, वकील, डॉक्टरांशीही संवाद साधणे, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय पत्रकार परिषद घेणे, मुलाखतीच्या माध्यमातूनही सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. रालोआ खासदारांना कमीत कमी दोन दिवस आणि एक सायंकाळ आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यावर काढण्यास सांगण्यात आले आहे.
खासदार आणि पथकातील सदस्यांना सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच भाजपचे आठ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवस योजनांचा प्रचार करतील.