ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - जुहू परिसरात गेल्या 10 वर्षांपासून वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. विविध तपास यंत्रणांकडून या 26 पाकिस्तानी नागरिकांचा रात्रंदिवस शोध सुरू आहे. गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात वास्तव्यास असलेले हे पाकिस्तानी नागरिक गेल्या दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले. यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू आहे.
जुहूसहीत अन्य परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि संशयित ठिकाणांची तपासणी करुन पोलीस या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मुंबई पोलिसांतील एकही अधिकारी प्रसिद्धी माध्यमांसोबत उघडपणे बोलण्यास तयार नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएसकडे या बेपत्ता 26 पाकिस्तानी नागरिकांचा शोध लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सी फॉर्म भरल्यानंतर यातील एकाही व्यक्तीनं कोठे वास्तव्य करणार आहेत? कोणाशी संपर्क साधणार आहेत?, याची माहिती दिली नव्हती. भारतात येणा-या सर्व पाकिस्तानी नागरिकांना सी फॉर्म भरणं आवश्यक असते.
सी फॉर्मच्या आधारे या पाकिस्तानी नागरिकांचा पत्ता मिळवण्यात अपयश आल्यानंतर तपास यंत्रणांनी आपल्या शोधमोहीमेची गती वाढवली. कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, याबाबतीच स्पष्ट माहिती सीफॉर्मद्वारे देणे प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त त्यांचा भारतातील वास्तव्याचा कालावधी, पासपोर्टची प्रत, व्हिसा यांसारखी महत्त्वाची पाकिस्तानी नागरिकांना द्यावी लागते.
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसनं मुंबईतील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये तपासणी करण्यासाठी आपली पथकं रवाना केली आहेत. काही दिवसांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये दाखल होऊन येथील विविध भागांची टेहळणी केल्याची माहिती समोर आल्यानं सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.