सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर येथे समोरुन येणा-या वाहनाचा अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला सकाळी ६.२० वाजता मोठा अपघात झाला. तीन पलटी खाऊन सुमारे १५ फूट खाली खोल झाडीत गाडी गेली. यामध्ये एकूण २७ प्रवासी जखमी झाले असून ७ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, परेल-मुंबई येथून शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता बबन मल्हार (सावंतवाडी) यांच्या मालकीची विशाल ट्रॅव्हल्स (क्रमांक एम. एच. ०४, जीपी ००४५) ही खासगी बस बसचालक अली इस्माईल शेख (५२) हा सावंतवाडी-बांदा येथे घेऊन जात होता. खारेपाटण संभाजीनगर येथे महामार्गावर समोरुन येणाºया एका खासगी ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे व ओव्हरटेक केल्यामुळे बस चालकाने गाडी वाचविताना साईडपट्टीचा अंदाज न आल्याने सुमारे १५ फूट खोल झुडपात कोसळून ती पलटी झाली. या अपघाताचे वृत्त खारेपाटणमध्ये समजताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच संदेश धुमाळे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना तातडीने गाडीतून बाहेर काढून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे तसेच खासगी डॉक्टर डॉ. प्रसाद रानडे व डॉ. वडाम यांनी जखमी प्रवाशांवर उपचार केले. या अपघातात अशोक गोविंंद पवार (५२, जवळेथर), सयाजी कृष्णा पवार (५८, जवळेथर, राजापूर), अर्जुन संभाजी कदम (४६), हिम्मतराव गोविंद कांबळे (५५), शुभांगी रामचंद्र सावंत (३२), सरिता रामचंद्र सावंत (५४), यशोदा जयसिंग जाधव (६२, सर्व राहणार साळिस्ते, कणकवली), रमाकांत तातू धुरी (६२, शेर्ले, सावंतवाडी), दर्शना महादेव पाष्टे (२९, सावंतवाडी), मनोहर गोविंद जाधव (५२, वारगांव), भाग्यश्री रमाकांत धुरी (६२, शेर्ले, सावंतवाडी), तृप्ती एकनाथ धुरी (१९, शेर्ले, सावंतवाडी), भरत साहेबराव केंद्रे (३०, लातूर), हेमंत मोहन कांबळे (२७, साळीस्ते, कणकवली), विलास रावसाहेब लाडे (३०, बीड), स्वप्नील सुरेश साळीस्तेकर (२७, साळीस्ते), सतीश रामचंद्र मेस्त्री (२५, ओसरगाव), शाहू धोंडू पाटील (२४, सावंतवाडी), सचिन मोहन मेस्त्री (४०, ओसरगाव), अली ईस्माईल शेख (बसचालक, ५२, सातारा), भगवान विठ्ठल जाधव (५९, वारगांव), दीपक मुकुंद पवार (४२, जवळेथर, राजापूर), कृष्णा रमाकांत धुरी (२१, शेर्ले, सावंतवाडी), मनोहर सोनू मेस्त्री (५५, ओसरगाव), सुनीता चंद्रकांत मेस्त्री (४६, ओसरगाव), योगिता चंद्रकांत मेस्त्री (२७, ओसरगाव), मिलिंद भिकाजी कांबळे (४२, चिंचवली) असे एकूण २७ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी अशोक गोविंद पवार, सयाजी कृष्णा पवार (जवळेथर, राजापूर), अर्जुन संभाजी कदम, हिम्मतराव गोविंद कांबळे, शुभांगी रामचंद्र सावंत, सरिता रामचंद्र सावंत, यशोदा जयसिंग जाधव (सर्व राहणार साळीस्ते, कणकवली) या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर तसेच डोक्याला मार लागल्यामुळे पुढील उपचाराकरीता त्यांना कणकवली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. खारेपाटण टाकेवाडी येथे एक दिवसापूर्वीच रामेश्वर ट्रॅव्हल्स या खासगी बसला अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले होते. रविवारी दुसºयांदा पुन्हा खारेपाटण येथे अपघात झाला आहे. त्यामुळे खारेपाटण हे आता अपघाताचे गाव म्हणून ओळखले जात आहे.प्रतिक्रिया‘खारेपाटण हे मुंबई-गोवा महामार्गावर व रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले महत्त्वाचे गाव असून तेथे सातत्याने केव्हाही रात्री-अपरात्री अपघात होत असतात. मात्र तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एकच डॉक्टर काम करीत असल्यामुळे अपघातावेळी तारांबळ उडते. तरी अशा महत्त्वाच्या ठिकाणी दोन डॉक्टरांची गरज आहे. मात्र आम्हांला गंभीर परिस्थितीवेळी खासगी डॉक्टराची मदत घ्यावी लागते. प्रशासनाने याचा विचार करावा.- रमाकांत राऊत (नवनिर्वाचित सरपंच, खारेपाटण)
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी पलटून 27 प्रवासी जखमी, मुंबईहून सावंतवाडीला जाणा-या लक्झरीला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 10:06 AM