परभणी : सुरक्षित प्रवास म्हणून ओळख असलेली एसटी बससेवा मागील काही दिवसांपासून मोडकळीस आली आहे. परभणी आगारातील परभणी - कुंभारी या बसचे सोमवारी रात्री ७ वाजता कुंभारीकडे प्रस्थान झाले. मात्र, वाटेत पाऊस सुरू झाल्याने बसमधील जवळपास २६ प्रवाशांना बसमध्ये छत्र्या उघडून २३ किमीचा प्रवास पूर्ण करावा लागल्याचा प्रकार घडला.
परभणी आगारातून जवळपास ५४ बसेस धावतात. या बसेसमधून दहा हजार प्रवासी दिवसागणिक प्रवास करतात. त्यामधून परभणी आगाराला १८ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, या आगारातील बहुतांश बसेस मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अनेक वेळा प्रवाशांनी प्रशासनाला बस नादुरुस्तीबाबत कल्पना दिली. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच सोमवारी रात्री ७ वाजता परभणी आगारातून कुंभारीकडे निघालेली बस शहापूरपर्यंत पोहोचली. मात्र, त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला. या पावसात पूर्ण बसला गळती लागली. त्यामुळे ज्या प्रवाशांकडे छत्री होती, त्यांनी छत्रीचा सहारा घेतला.
परभणी आगारातील गोल्डन मार्ग परभणी आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गामध्ये परभणी - कुंभारी या मार्गाचा समावेश आहे. परभणी आगारातून या मार्गावर सर्वाधिक १३ फेऱ्या दिवसभरात होतात. त्यातून चांगले उत्पन्नही आगाराला मिळते. परभणी आगारात गोल्डन रुट म्हणून पाहिले जात असताना या मार्गावर नादुरुस्त बस पाठविल्या जात असल्याने संताप आहे.