ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 17 - एका नगरसेवकाच्या घरात इंजिनिअरींगची परीक्षा पेपर लिहिणा-या 26 विद्यार्थ्यांना व तेथे उपस्थित असणा-या प्राध्यापकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थिनींचाही समावेश आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे.
सुरेवाडी येथील नगरसेवक सिताराम सुरे यांच्या इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी पेपर लिहिताना आढळून आले. औरंगाबाद क्राईम ब्रांचनं ही धडक कारवाई केली आहे. साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचा बी.ई.सिव्हिल तृतीय वर्षाचा सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉईंग या विषयाचा पेपर मंगळवारी झाला . मात्र या विद्यार्थ्यांनी केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर लिहून उर्वरित उत्तरपत्रिका कोरी ठेवली होती.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नगरसेवक सिताराम सुरे यांच्या घरी बोलावण्यात आले. तेथे दोन खोल्यांमध्ये बसून सर्व विद्यार्थी पेपर सोडवत होते. एवढंच नाही धक्कादायक बाब म्हणजे प्राध्यापक त्यांना उत्तरं सांगत होते. यावेळी संस्थाचालक मुंढे, नगरसेवक सुरेही तेथेच उपस्थित होते.
दरम्यान, या गैरप्रकाराची माहिती मिळाताच क्राईम ब्रांचनं सुरेंच्या घरावर धाड मारत कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले.
https://www.dailymotion.com/video/x844z7i