मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त प्रदेश भाजपाच्या वतीने सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकास पर्व’ हे महाअभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी २६ केंद्रीय मंत्री, पक्षाचे राज्यातील मंत्री, खासदार, आमदार त्यासाठी राज्यभर फिरणार आहेत. भाजपाचे आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील ‘वसंत स्मृती’मध्ये झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते या वेळी उपस्थित होते. या महाअभियानांतर्गत पक्षाचे नेते गावोगावी जाऊन सभा घेतील, जनतेशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतील. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती त्यांना देतील आणि उपलब्धीही सांगतील. विशेष म्हणजे हे नेते गावागावांत मुक्कामी जाणार आहेत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री अन्य राज्यांमध्ये जाणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जातील. बीसीसीआयचे अध्यक्ष खा. अनुराग ठाकूर हे जालना जिल्ह्यात दौरा करतील. द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तच्या कार्यक्रमांसाठी भाजपाने शिवसेनेला सोबत घेतलेले नाही. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासारखे एनडीएतील घटक पक्षाचे नेते येत आहेत; पण शिवसेनेच्या केंद्र वा राज्यातील मंत्र्यांचे यादीत नाव नाही. (विशेष प्रतिनिधी)समाधान शिबिराचा पॅटर्न राज्यभरात : हिंगणघाटचे भाजपा आमदार समीर कुणावार यांनी आपल्या मतदारसंघात राबविलेल्या समाधान शिबिराचे सादरीकरण आजच्या बैठकीत केले. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी त्याची प्रशंसा करून अशी शिबिरे भाजपाच्या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात घ्यावीत, असे सांगितले. भाजपाचे मिशन निवडणूक : महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या वर्षाअखेर होत असलेल्या निवडणुकीसाठी मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या बैठकीत केले. गावातील विकास कामांचे प्रस्ताव पक्षाच्या यंत्रणेमार्फत पाठवा. ते तातडीने मंजूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.पक्ष खडसेंच्या पाठीशी : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी खडसे यांची पाठराखण केली.
२६ केंद्रीय मंत्री राज्यभर फिरणार
By admin | Published: May 24, 2016 3:03 AM