मुंबई : आॅटोरिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचणी परिवहन विभागाकडून घेण्यात आली. २९ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत झालेल्या या परीक्षेत ४२ हजार ७९८पैकी ३५ हजार २६७ उमेदवारांनी परीक्षेसाठी उपस्थिती लावली. तर यातील २६ हजार १५३ उमेदवार उत्तीर्ण झाल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. ४२ हजार ७९८ आॅटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने वाटप १२ जानेवारी रोजी करण्यात आले. यातील यशस्वी उमेदवारांसाठी मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे यासह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात २९ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत परीक्षा घेण्यात आली. तर ही परीक्षा घेताना ज्या उमेदवारांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही, अशा उर्वरित उमेदवारांची परीक्षा ७ मार्च रोजी घेण्यात आली. यामध्ये ३५ हजार २६७ उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले आणि २६ हजार १५३ उमेदवार परीक्षेत पास झाले. या परीक्षेसाठी एक मराठी भाषेतील परिच्छेत उमेदवारांना वाचण्यासाठी देण्यात आला. यशस्वी उमेदवारांना इरादापत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून परवान्याचे शुल्क भरण्यात आले. यातून एकूण ३१ कोटी ७ लाख ५६ हजार रुपयांचे शुल्क मिळाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उत्तीर्ण उमेदवारांत मुंबईतील अंधेरी आरटीओचा प्रथम क्रमांक लागला आहे. अंधेरी आरटीओकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत जवळपास ३ हजार ८५0 उमेदवार पास झाले आहेत. तर बोरीवली आरटीओंतर्गत ३ हजार ३३१ आणि वडाळा आरटीओंतर्गत ३ हजार ३२७ उमेदवार पास झाले आहेत. (प्रतिनिधी)
मराठीच्या चाचणीत २६ हजार उत्तीर्ण
By admin | Published: March 09, 2016 5:43 AM