सचिन राऊत अकोला, दि. २७-सैन्य भरतीसाठी रविवार, २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकणार्यांमध्ये जिल्हय़ातील कानशिवणी येथील करिअर अकॅडमीचे संचालक अडकल्याने या अकॅडमीत प्रवेशित असलेले २७ विद्यार्थी आता संशयाच्या घेर्यात अडकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या अकॅडमीचे संचालक सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कानशिवणी येथे सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मालकीची आणि संचालीत असलेली करिअर अकॅडमी आहे. या अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात येतात. यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राज्य राखीव दल, सैन्यदल, इंडो तिबेट पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल यांसह पोलीस भरतीच्या उमेदवारांचे निवासी आणि अनिवासी भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात येते. जिल्हय़ातील शेकडो विद्यार्थी या करिअर अकॅडमीमध्ये प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना नोकरी लावून देण्याची हमी घेण्यात येत होती. अशातच अकॅडमीचे संचालक निर्मळे यांना पेपर फोडल्यानंतर अटक केल्याने ही अकॅडमी आता संशयाच्या कैचित अडकली आहे. या अकॅडमीचे शेकडोपैकी २७ विद्यार्थी २६ फेब्रुवारीच्या लेखी परीक्षेची तयारी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी बाहेरगावी गेल्याचेही खात्रीलायक वृत्त असून, त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. सुभाष निर्मळे यांना अटक झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे भवितव्यही धोक्यात सापडले आहे.नोकरी देण्याची हमीअकोला तालुक्यातील कानशिवणी येथील सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याला सैन्यात नोकरी देण्याची हमी देण्यात येत होती, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या प्रशिक्षण केंद्रात नोकरीची हमी देण्यात येत असल्याने शेकडो विद्यार्थी प्रवेशित होते. यामधील २७ विद्यार्थी या घोटाळय़ामुळे संशयाच्या फेर्यात अडकले आहेत.प्रशिक्षण केंद्र रडारवरसैन्य भरतीचे लेखी पेपर परीक्षेपूर्वीच फोडणार्यांमध्ये आणि सौदेबाजी करणारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक निघाले आहेत, त्यामुळे राज्यातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आता रडारवर आले आहेत. या प्रशिक्षण केंद्रांची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती आहे. अकोला जिल्हय़ातील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांची लवकरच तपासणी होणार आहे.
२७ विद्यार्थी संशयाच्या घे-यात!
By admin | Published: February 28, 2017 1:59 AM