लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पाणीकपातीमुळे शुक्रवारी शटडाउन, त्यात मध्यरात्री फुटलेली जलवाहिनी आणि रविवारी पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ केंद्रात झालेला तांत्रिक बिघाड, असे सलग तीन दिवस एमआयडीसीकडून २७ गावे आणि एमआयडीसी निवासी भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी, तेथील रहिवाशांचे पाणीटंचाईमुळे प्रचंड हाल झाले. केडीएमसी हद्दीतील २७ गावे आणि एमआयडीसी निवासी विभाग यांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. सध्या लघुपाटबंधारे विभागाकडून लागू असलेल्या पाणीकपातीमुळे या भागांमधील पाणीपुरवठा दरशुक्रवारी बंद ठेवला जातो. मध्यरात्री १२ नंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याचा दाब वाढल्याने जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी काटईनाका परिसरात फुटली. या घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी दुपारी १ पर्यंत चालल्याने दिवसा पाणी मिळाले नाही. रात्री ८ च्या सुमारास कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे पुरेशा प्रमाणात रहिवाशांना पाणी उपलब्ध झाले नाही. दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जांभूळ केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी बंद केल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांनी दिली. जलवाहिनी फुटीच्या घटनेला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत. जीर्ण जलवाहिन्या बदलण्याऐवजी त्या केवळ दुरुस्त केल्या जात आहेत. कोळवली आणि काटई येथे मोठ्या प्रमाणावर अशा जलवाहिन्या आहेत. केवळ दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी कंत्राटदारांचे भले करत असल्याचा आरोप म्हात्रे यांचा आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा मोबाइल बंदएकीकडे धरणांत पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतानाही तीन दिवस घरांमध्ये पाणी नाही. त्यामुळे रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, त्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना असल्याचे स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले. पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास एमआयडीसी कार्यालयावर धडक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२७ गावे, एमआयडीसीत ठणठणाट
By admin | Published: June 05, 2017 3:27 AM