मुंबई : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी राज्यव्यापी धडक कारवाई करून सुमारे २७३ कोटी रुपयांचा सिगारेटचा अवैध साठा जप्त केला. ‘सिगारेट ओढणे आरोग्यास हानिकारक आहे’ आणि ‘तंबाखूमुळे कर्करोग होतो’ असा चित्ररूप व शाब्दिक वैधानिक इशारा सिगारेटच्या पाकिटावर दोन्ही बाजूंना ८५ टक्के जागेवर छापणे बंधनकारक असूनही त्याहून छोट्या आकाराचा वैधानिक इशारा छापलेल्या पाकिटांचा जुना माल राज्यात राजरोजसपणे विकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.‘एफडीए’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत पुणे विभागात सर्वाधिक ११० कोटी रुपयांचा सिगारेटसाठा जप्त केला गेला. कोकण विभागात १०३ कोटी रुपयांचा तर मुंबई व नागपूर विभागांत प्रत्येकी ३० कोटी रुपयांची सिगारेटची अवैध पाकिटे जप्त केली गेली. इतर विभागांत व जिल्ह्यांत सुमारे ३० कोटी रुपयांचा माल जप्त केला गेला. मंगळवारीही ही कारवाई काही ठिकाणी सुरू होती.या धाडींनंतर आता ‘एफडीए’ सिगारेट उत्पादक, वितरक, आयातदार व किरकोळ विक्रेते यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी उत्पादकास २ वर्षांपर्यंचा कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वितरक व विक्रेत्यास पहिल्या गुन्ह्यासाठी १ वर्षापर्यंत कैद किंवा १ हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि जाहिरात यांचे नियमन करण्यासंबंधीच्या सन २००३च्या ‘कॉटपा’ नियमावलीनुसार सिगारेटच्या पाकिटावर दोन्ही बाजूंना एकूण जागेच्या ४५ टक्के जागेवर चित्ररूप व शाब्दिक वैधानिक इशारा छापणे बंधनकारक होते. आॅक्टोबर २०१४मध्ये वैधानिक इशाऱ्याचा हा आकार वाढवून ८५ टक्के (६० टक्के चित्ररूप व २५ टक्के शाब्दिक) करण्यात आला. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. असे असूनही राज्यात ४५ टक्के आकाराचा वैधानिक इशारा असलेली सिगारेटची पाकिटे राजरोसपणे विकली जात आहेत अशी खबर मिळाल्याने ‘एफडीए’ने ही कारवाई केली. (विशेष प्रतिनिधी)
२७३ कोटींच्या सिगारेट जप्त
By admin | Published: April 06, 2016 5:11 AM