जयंत धुळप , अलिबागजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतूपासून धोका आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २७.५५ टक्के आहे. बालकांमधील कृमीदोष नष्ट करून निरोगी आणि सशक्त पिढी तयार करण्याच्या उद्देशाने १० फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ म्हणून देशभरात पाळण्यात येतो. या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म राबविण्यात येतो. भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. १५ ते १९ वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्ताक्षय आणि कुपोषण यामुळे होतो. कृमीदोषामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा राबविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन १० फेब्रुवारी रोजी राबविण्यात येत असून, या दिनानिमित्त १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना, शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म जिल्हास्तरावर प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी गुरुवारी जंतनाशक दिन आयोजन आढावा बैठकीत दिल्या आहेत. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. जगदीश देवकर, जिल्हा परिषद व जिल्हा रु ग्णालय येथील पी.एच.एन., जिल्हा शिक्षण अधिकारी रायगड जिल्हा परिषद तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या देण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी याबाबत डॉ. गवळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व ठिकाणी आवश्यक तो गोळ्यांचा पुरवठा करावा. सर्व लाभधारकांना गोळ्यांचा डोस दिला जाईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
महाराष्ट्रात २७.५५ टक्के कृमीदोष
By admin | Published: February 10, 2017 4:30 AM