ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) रिक्षा परवाने वाटपासाठी प्रथमच घेतलेल्या मराठी भाषेच्या मौखिक चाचणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. या वेळी उमेदवारांकडून पाचवी-सातवीची इतिहासाची पुस्तके वाचून घेण्यात आली. ठाणे विभागातील ४ हजार ८२१पैकी २ हजार ७५८ जण यशस्वी झाले, तर ६९४ उमेदवारांवर अनुत्तीर्ण झाले. तसेच १ हजार ३६९ जणांनी दांडीच मारली. इरादापत्र देताना आकारलेल्या शुल्कापोटी शासकीय तिजोरीत सुमारे ४ कोटी ३५ लाखांहून अधिक रुपयांची भर पडली. मात्र, मुलाखतीला हजर न राहणाऱ्यांना पुन्हा बोलवण्यात येणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले.परिवहनमार्फत २०१६मध्ये १ लाख नवीन परमिटवाटप कार्यक्रम जाहीर झाल्यावर ७ जानेवारीपर्यंत आॅनलॉइन पद्धतीने अर्ज मागवले होते. तर, १२ जानेवारीला ड्रॉ काढला. या वेळी ठाणे आरटीओ विभागातील ४ हजार ८२१ जणांना परवान्याची लॉटरी लागली. त्यानुसार, आरटीओ अधिकारी विकास पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे आणि हेमांगिनी पाटील यांच्याद्वारे शनिवार ते गुरुवार असे सहा दिवस पारदर्शक पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या.
रिक्षा परवान्यासाठीच्या परीक्षेत २,७५८ यशस्वी
By admin | Published: March 05, 2016 3:41 AM