मुंबई : जलयुक्त शिवार योजनेसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये १० हजार ३७३ चेक राज्यातील नागरिक, संस्थांनी दिले. त्याद्वारे ९० कोटी रुपये जमा झाले. मात्र २८ वटू शकले नाहीत. विरोधकांनी नीट माहिती घेऊन आरोप केले असते तर बरे झाले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लागावला.मुख्यमंत्री निधीत बनावट चेक जमा झाल्याचा आरोप करीत अनंत गाडगीळ, डॉ. सुधीर तांबे आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. जे २८ चेक वटू शकले नाहीत त्यांची रक्कम १० लाख ३६ हजार रुपये होती. त्यातही तीन जणांनी नवे चेक दिले आणि ते वटले आहेत. हे तिघे आणि ज्यांच्या सह्या जुळत नव्हत्या म्हणून चेक परत आले होते त्यांनी दुरुस्ती केल्यानंतर ७ लाख ५० हजार रुपये जमा झाले आहेत. याचा अर्थ न वटू शकलेल्या चेकची रक्कम चार लाख रुपयेदेखील नव्हती. अशावेळी त्यावर टीका करण्यापेक्षा ९० कोटी रुपये जमा झाल्याबद्दल विरोधकांनी सरकारचे अभिनंदन करायला हवे होते, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. ही देणगी लोकांनी स्वेच्छेने दिलेली होती. त्यामुळे चेक वटले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. डान्सबार असोसिएशनने या निधीमध्ये ३० लाख रुपये दिले आहेत का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्याचा स्पष्टपणे इन्कार केला. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्री निधीत आलेले २८ चेक वटलेच नाहीत!
By admin | Published: March 12, 2016 4:23 AM