मेघनाथ विशे पडघा : शिवसेना आणि हिंदुत्व हा आमचा श्वास असून, तोच दाबण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेत असताना सुरू हाेता. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याशिवाय आमच्यासमाेर दुसरा कोणताही पर्याय नव्हता, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी बुधवारी ‘लाेकमत’जवळ मांडली. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहाेत.
विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी ठाण्यापर्यंत आलो, तोपर्यंत आम्हाला याबाबत अजिबात कल्पना नव्हती. आम्ही पाच ते सहा आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो. आम्ही तलासरीमार्गे सुरतच्या दिशेने निघालो. मात्र, महाराष्ट्र-गुजरात सीमेवर चेक पोस्टवर नाकाबंदी असल्याने आम्ही आडमार्गाने गुजरातमध्ये पोहोचलो, असे मोरे यांनी सांगितले. यादरम्यान सर्वांकडील मोबाइल सुरक्षा व गोपनीयतेच्या कारणास्तव जमा करण्यात आले हाेते. त्यामुळे जिल्हाप्रमुखांनाही कल्पना मी देऊ शकलो नसल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी आगीत तेल ओतले ! खासदार संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. आमच्याच मतांवर निवडून येणाऱ्या या व्यक्तीने राजीनामा देऊन आमच्यावर टीका केली. आमच्याबाबत बळीचे रेडे, डुक्कर, वेश्या असे घाणेरडे शब्दप्रयोग त्यांनी केले. मुळात आम्ही काेणत्याही पदाकरिता बंड केलेलेच नाही, तर शिवसेना वाचवण्यासाठीच आमचा हा खटाटोप केला. मात्र, राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले, अशी टीका मोरे यांनी केली.
मंत्रालयात टक्केवारी घेऊन सुरू हाेते निधीवाटप!आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघासाठी २८ कोटी रुपये दिले. मात्र, प्रत्यक्षात अवघे तीन कोटीच देण्यात आले. उर्वरित सर्व निधी हा काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना तसेच ठेकेदारांना त्यांच्या मागणीनुसार देण्यात आला. मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर टक्केवारी घेऊन निधीवाटप केला जात होता, असा आराेपही त्यांनी यावेळी केला.