दिगंबर जवादे, गडचिरोलीनक्षल्यांकडून घातपाताच्या घटनांमध्ये बहुतेक पोलीस वाहनांनाच लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे घनदाट जंगलात नक्षल्यांसोबत लढणे जेवढे कठीण आहे. तेवढेच या भागातून वाहन चालविणेसुद्धा जोखमीचे काम झाले आहे. त्यामुळे पोलीस जवान वाहनचालक बनण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. मात्र अशा धोकादायक परिस्थितीत २८ जिगरबाज महिला पोलीस वाहनचालकाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत. त्यांच्या या कामगिरीची पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह नागरिकांकडूनही प्रशंसा होत आहे. नक्षलवादाला पायबंद घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र योजना आखून प्राधान्याने निधी उलपब्ध करून दिल्या जात आहे. नक्षल्यांचा बंदोबस्त करण्यासोबतच त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्णात सीआरपीएफ, एसआरपीएफ, स्थानिक पोलीस जवान, सी-६० चे जवान व सॅग असे एकूण १० हजारांपेक्षा अधिक जवान तैनात आहेत. हे जवान जंगलात जाऊन नक्षलविरोधी अभियान राबवितात. पाच वर्षांपूर्वी पोलीस जवान नक्षलविरोधी अभियानात पोलीस वाहनांचा सर्रास उपयोग करीत होते. ही बाब नक्षल्यांच्या लक्षात आल्यानंतर भूसुरूंगाच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रकार वाढले होते. यामध्ये ५० ते ६० पोलीस जवान शहीद झाले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोध मोहीम राबविताना वाहनांचा वापर करण्यावर बंदी घातली. आजपर्यंत घातपाताच्या सर्वाधिक घटना पोलीस वाहनांवर हल्ला करूनच झाल्या आहेत. त्यामुळे जंगलात नक्षल्यांशी लढण्याएवढेच या भागातून वाहन चालविणेही तेवढेच धोकादायक व जीवावर बेतणारे काम मानल्या जाते. त्यामुळे वाहनचालकाचे काम स्वीकारण्यास जवान तयार होत नाही. मात्र, काही जिगरबाज महिला पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले आहे. पोलीस दलात एकूण २८ महिला वाहनचालक आहेत. त्यांना नागपूर येथील मोटार परिवहन विभागात सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांची वाहन चालविण्याची चाचणी घेऊन परवाना देण्यात आला. काही महिला वाहनचालक गडचिरोली पोलीस मुख्यालयात आहेत. तर काही दुर्गम भागात असलेले पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत कार्यरत आहेत.
२८ महिला पोलीस बनल्या सारथी!
By admin | Published: September 13, 2014 2:58 AM