ठाणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी रौद्र रूप दाखवत ठाणे जिल्ह्यास झोडपून काढले. मंगळवारी दिवसभरात ठाण्यात तब्बल २८९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या तडाख्यात कळव्यातील मुकंद कंपनीजवळ तिघे बुडाल्याचे वृत्त आहे. ठाणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद असताना दुपारनंतर कळव्यात रूळांवर पाणी साचल्याने ठाणे-कल्याण वाहतूकही बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.कळव्यात बुडालेल्या तिघांपैकी एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह कळव्यात मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, त्याची ओळख पटलेली नाही. त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी महाराज रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. उर्वरित दोघांचा मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते.भागात रूळांवर पाणी साचल्यानेरेल्वे वाहतूक सेवा दुपारी १ वाजेनंतर बंद ठेवली. यामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. जिल्ह्यात सरासरी १२५ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १११.१९ टक्के पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. तर तानसा परिसरात मंगळवारी दुपारपर्यंत १९५ मिमी पाऊस झाला. रात्री तानसाचे ३८ दरवाजे स्वयंचिलत पद्धतीने उघडले होते. मात्र, दुपारनंतर १६ दरवाजे उघडे ठेवमन उर्वरित बंद केल्याचे असे सहायक अभियंता यांनी सांगितले. पावसाचा जोर लक्षात घेऊनसोमवारी रात्री तानसा धरणाचे स्वयंचलित ३८ दरवाजे उघडले. मंगळवारी यातील दुपारी २२ दरवाजे बंद करून १६ दरवाजे उघडले ठेवले. तर शहापूर व भिवंडी तालुक्यातील नदी काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन गावकºयांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी अशा रीतीने सर्व दरवाजे उघडे करावे लागतात, अशी माहितीही त्यांनी दिली. तर ठाणे शहरातील सखल भागातील अनेक घरांत पाणी घुसल्याने रहिवाशांचे हाल झाले. यात कोपरी कॉलनी, खोपट, लोकमान्यनगर, चरई, धोबी आळी येथील घरांचा समावेश आहे. ठाण्यात पहिल्यांदाच इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही पाणी साचले होते. या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या आणि ठाणेकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला.उल्हासनदीला पूर आला असून बारवी धरणाचे पाणी देखील सोडण्यात आले आहे. या पुराच्या पाण्यामुळे रायता पूल धोक्याचे पातळीवर ओलांडण्याची स्थिती आहे. यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंंद करावा लागण्याची शक्यता कल्याण - अहमदनगर महामार्गाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी सांगितले.माळशेज घाटात वाहतूक सध्यातरी सुरळीत आहे. या महामार्गाने येणारे वाहतूक बदलापूर मार्गे कल्याणच्या दिशेने येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. शहापूरमधील मोहिले, नेवरे, डिब्बे या गावांमध्ये दुपारी गुडघ्यापर्यंत नदीच्या पुराचे पाणी शिरले. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यातील अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि भीवाई गावांमध्येही नदीचे पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन गावकºयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुरबाड तालुक्यातील नद्यानाही पूर आल्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत.
ठाणे जिल्ह्यात १२ तासांत २८९ मिमी पाऊस : तानसा धरणाचे १६ दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 5:11 AM