मुंबई : जवाहर लाल नेहरु पोर्ट ट्रस्टहून मुरादाबादला जाणाऱ्या कंटेनर ट्रेनचे ११ डबे ३ जुलैच्या मध्यरात्री २.५0 च्या सुमारास डहाणू रोड जवळ घसरले. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही दिशांना जाणाऱ्या १00 पेक्षा जास्त मेल-एक्सप्रेस सेवांवर मोठा परिणाम झाला. यातील तब्बल २९ लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करताना अनेक ट्रेन मधल्या स्थानकांवर रदद् करण्यात आला तर काहींचा मार्गही वळवण्यात आला. मंगळवारपर्यंत सेवा पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक ट्रेन्सना डहाणूच्या आधीच्या स्थानकांवर शेवटचा थांबा देण्यात आला आणि त्या ट्रेन तेथूनच पुन्हा रवाना करण्यात आल्या. त्यामुळे मुंबईतून सुटणाऱ्या ट्रेनवरही त्याचा परिणाम होऊ लागला. काही ट्रेन रद्द करण्यात आल्या. तर काही वेळ बदलून अन्य मार्गाने चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून ट्रेन पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात गर्दी केली आणि काही पर्याय मिळेल का याची विचारणा केली. पालघर, वलसाड आणि नवसारी येथे जादा बसेस सोडण्याबरोबरच खानपानाची सुविधा करण्याात आली. त्याचप्रमाणे मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, सुरत, डहाणू रोड, वलसाड स्टेशनवर विशेष ‘रिफंड’ कांऊटर रेल्वेकडून सुरू करण्यात आले. ३0 लाख रुपयांपेक्षा जास्त रिफंड प्रवाशांना देण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. पाच ट्रेनच्या वेळा बदलण्यात आल्या, तर तीन ट्रेन अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवांवर त्याचा परिणाम झाला नाही. मात्र विरार ते डहाणू दरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्या आणि शटल सेवांवर परिणाम झाला. लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या.प.रेकडून उच्चस्तरीय चौकशी समिती घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. नेमके कारण समितीकडून शोधून त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
लांब पल्ल्याच्या २९ ट्रेन रद्द
By admin | Published: July 05, 2016 1:53 AM