पुणे : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आपल्या पहिल्याच तडाख्यात पुणे शहरामध्ये दोन बळी घेतले असून, वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी बंडगार्डन भागातील विधानभवन परिसरात घडली. गौतम लक्ष्मण वीर (वय ५०, रा. सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलनी, आकुर्डी) व बालय्या मार्क पिडथल्ला (वय ६२, रा. घोरपडी) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली तेव्हा रस्त्याने जात असलेले गौतम आणि बालय्या हे दोघेही विधानभवनाजवळील एका झाडाखाली थांबले. पोलीस चौकीशेजारीच असलेल्या या झाडावर अचानक वीज पडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघा जणांना तातडीने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांना दोघांच्याही खिशातील कागदपत्रांमधून तसेच मोबाईलमधून नातेवाइकांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्याही नातेवाइकांना संपर्क साधला. रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघांचेही नातेवाईक जमा झाले होते. पोलिसांनी या दोघांच्या मृतदेहाजवळ आढळून आलेली एक दुचाकी आणि एक सायकल पोलीस ठाण्यात जमा केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांनी दिली. पुणे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी शहरात विजेच्या कडकडाटासह पूर्वमोसमी हजेरी लावली़ शहराच्या अनेक भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला़ शहरात ३मिमी. पावसाची नोंद झाली.गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान होते़ त्यामुळे तापमानात घट झाली असली, तरी उकाडाही वाढला होता़ हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता़ आकाशात ढग जमा होत होते़ पण, काही वेळांतच ढग विरत असल्याने गेली अनेक दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेल्या नागरिकांचा विरस होत होता़ बुधवारी सकाळपासून हवेतील उष्मा वाढला होता़ कमाल तापमानातही वाढ दिसून येत होती़ दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली़ त्यानंतर सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली़ कार्यालये सुटत असतानाच पावसाला सुरुवात झाल्याने घरी जाण्याच्या तयारीत असलेल्यांची एकच धावपळ उडाली़ शहरात अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने निसरडे झाल्याने काही दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या़ कॅम्प परिसरात पावसाचा चांगलाच जोर होता़ विश्रांतवाडी, हडपसर, गोखलेनगर, औंध, कर्वेनगर, नगर रोड, विश्रांतवाडी परिसरात रिमझिम पाऊस झाला़ शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ परिसरातही सायंकाळी थोडा वेळ पाऊस झाला़ त्याला फारसा जोर नव्हता़ पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ न्यू इंग्लिश स्कूलच्या रमणबाग शाळेत दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता़ या पावसामुळे मैदानात पाणी पाणी झाल्याने कार्यक्रम सुरू होण्यास उशीर झाला़
पहिल्याच पावसाचे २ बळी; पुणेकरांची उडाली तारांबळ
By admin | Published: June 02, 2016 12:54 AM