शिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथून जवळच असलेल्या मसलापेन येथील मूळ रहिवासी ज्ञानेश ठाकूर या युवकाने हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे पार्लर व्यवसायात जम बसविला आणि आर्थिक परिस्थिती सुधारतानाच मसलापेन येथे आपल्या जन्मगावी तब्बल ३ कोटी रुपये खर्चून भव्य साई मंदिराची उभारणी केली. त्यामुळे मसलापेन येथे प्रतिशिर्डीच अवतरल्याचा अनुभव भाविकांना येत आहे. हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
शिरपूर जैनपासून १६ किलोमीटर अंतरावरील मसलापेन येथील ज्ञानेश ठाकूर यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. मोलमजुरी करून आई- वडील, ज्ञानेश व त्यांचे दोन भाऊ अशोक व तेजराव घरखर्च भागवीत असत. ज्ञानेशमध्ये मात्र गरिबीतून बाहेर पडण्याची जिद्द होती. याच जिद्दीतून तो साधारण १५ वर्षांपूर्वी गाव सोडून बंगळुरूला गेला. तेथे पार्लर व्यवसाय शिकला. आजघडीला बंगळुरूत ज्ञानेशचा पार्लर व्यवसाय जोरात सुरू आहे. ज्ञानेशच्या पार्लरमध्ये कर्नाटकातील क्रिकेट खेळाडू, सिने अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते नियमित येतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून ज्ञानेशच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली. साईबाबांवर निस्सीम श्रद्धा असलेल्या ज्ञानेशने मसलापेन येथे भव्य साई मंदिर उभारले.
मी १५ वर्षांपूर्वी कर्नाटकात रोजगारासाठी गेलो. बंगळुरू येथे पार्लर व्यवसाय सुरू केला. तो भरभराटीस आला. या उत्पन्नातून रक्कम जमा करीत भव्य मंदिर उभारले. - ज्ञानेश ठाकूर, मूळ रहिवासी मसलापेन