लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तीन किलो वजनाचा... एक फूट उंच आणि १२ सें.मी. रुंद आकारमानाचा बर्गर अवघ्या १५ मिनिटांत फस्त करण्याच्या स्पर्धेत बुधवारी ठाण्यातील खवय्या स्पर्धक अपयशी ठरले. कुणी एकाने बर्गर मटकवला नसल्याने हे पारितोषिक कुणा एकाला पटकवता आले नाही. बर्गरचा सर्वात मोठा बाईट घेतलेल्या अमित पासी याला प्रथम, इंद्रनील चंद्रा याला द्वितीय तर फैजान अन्सारी याला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. कुणी बर्गरचे किती बाईट घेतले याचे मोजमाप घेऊन विजेते ठरवण्यात आले. लहान बाईट घेतला होता, त्यांच्यावरच उरलेला बर्गर संपवण्याची वेळ आली.ठाणेकर हे मामलेदाराच्या झणझणीत मिसळीपासून राममारुती रोडवरील गरमागरम वडे किंवा तलावपाळीवरील चाट अशा अनेकविध मराठमोळ्या खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेण्याकरिता प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पिझ्झा, बर्गर वगैरे जंक फूडची जॉइंटसदेखील ठाणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तुडुंब असतात. त्यामुळे येथील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये चंद्रिश शेट्टी व स्वाती बदादा, गणेश पुजारी, समीर सकपाळ आणि कौस्तुभ वाघ यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. हा बर्गर शेफ राजू गडाई यांनी अवघ्या १० मिनिटांत तयार केला होता. त्यात कटलेट, बटर, सॉस, भाजी, फ्रेंच फ्राइज यांचा समावेश होता.
३ किलोचा बर्गर १५ मिनिटांत केला नाही फस्त
By admin | Published: July 13, 2017 3:41 AM