पुणे : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची मशागतपूर्व, लागवडीनंतर व वाढीदरम्यान काळजी कशी घ्यावी, शेतमालाचे प्रतवारीकरण, पॅकेजिंग कसे असावे या विषयी राज्यातील तब्बल ३ लाख शेतकऱ्यांची कृषी विभाग शाळा घेणार आहे. सोयाबीन, भात, कापूस, तूर, मका, ज्वारी व हरभरा या पिकांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साखर संकुल येथे कृषी विभागाची आढावा बैठक झाली. त्यात शेतकरी शेती शाळेचे नियोजन केले. राज्यातील १२ हजार गावांमध्ये येत्या खरीप हंगामापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या गावांमधील प्रत्येकी २५ शेतकऱ्यांची या उपक्रमा अंतर्गत निवड करण्यात येईल. त्यात प्रयोगशील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागा अंतर्गत असलेले सर्व उपविभाग एकत्रित येऊन एक मोहीम म्हणून ही योजना राबविणार आहेत.
कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतकरी शेतीशाळा घेण्यात येईल. पेरणीपूर्व घ्यायची दक्षता, जमीनीची मशागत, बियाणांची निवड, लागवड कालावधी, जमिनीच्या सुपिकता निर्देशांका प्रमाणे खतांचा वापर, पिकाची वाढीची अवस्था, कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन याची माहिती दिली जाईल. या शिवाय शेतमालाचे , पॅकेजिंग याबाबतही शेतकºयांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या शेतकºयांनी आपल्या गावातील इतर शेतकºयांना प्रशिक्षित करणे अपेक्षित आहे.
या मोहीमेसाठी राज्य आणि विभागस्तरावर समन्वयकांची नेमणूक केली असून, त्यांना २ हजार क्षेत्रिय अधिकारी आणि कर्मचारी व राज्यातील २० हजार शेतकरी मित्र मदत करतील. तसेच, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व पुरस्कार प्राप्त शेतकºयांचाही यात सहभाग असणार आहे. विकास शेती शाळेच्या प्रशिक्षण, प्रसिद्धीसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली.