मुंबई : मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच विमानांच्या टेक आॅफ आणि लँडिंगसाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. विमानतळावरील मुख्य रन वेची १ फेब्रुवारीपासून डागडुजी करण्यात येणार असून, ती तीन महिने चालेल, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबई विमानतळावर दोन रन वे असून, यातील मुख्य रन वे त्याच्या डागडुजीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा रन वे बंद ठेवण्यात येईल आणि त्यानंतर तो विमानांसाठी खुला राहील. तोपर्यंत सकाळपासून पर्यायी म्हणून दुसऱ्या रन वेवरून वाहतूक सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्य रन वेवरून दररोज जवळपास ८00 विमानांचे उड्डाण आणि आगमन होते. ही वाहतूक पर्यायी रन वेवरून जरी केली जाणार असली, तरी हा रन वे छोटा असल्याने त्याची क्षमता फार कमी आहे. त्यामुळे उड्डाण आणि आगमनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, पर्यायी रन वेमुळे विमानांच्या उड्डाण आणि आगमनावर परिणाम होणार नसल्याचे मुंबई विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
विमानतळावर ३ महिने ‘मेगाब्लॉक’
By admin | Published: January 24, 2017 4:37 AM