२०१४ मध्ये ३४२२ उमेदवारांनी गमावली होती अनामत; ४११९ उमेदवार होते रिंंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 03:21 AM2019-09-12T03:21:56+5:302019-09-12T06:43:02+5:30
सत्तारूढ सेना-भाजपच्या १७८ उमेदवारांचा समावेश
धनंजय वाखारे
नाशिक : २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४११९ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. त्यापैकी ३४२२ उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागली होती. पराभूत होऊनही अनामत रक्कम वाचलेल्या उमेदवारांची संख्या ४०९ इतकी होती. एकूण मतदान ६३.०८ टक्के झाले होते.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि कॉँग्रेस-राष्टÑवादी हे स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे उमेदवारांची संख्या मोेठ्या प्रमाणावर वाढली. महाराष्ट्रातील एकूण २८८ मतदारसंघांत ४११९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात ३८४२ पुरुष, तर २७७ महिला उमेदवार होत्या. सर्वात कमी ५ उमेदवार दोन मतदारसंघांत होते, तर १५ पेक्षा अधिक उमेदवार एकूण ९३ मतदारसंघांत नशीब आजमावत होते. ६१ मतदारसंघांत ६ ते १० उमेदवार होते, तर १३२ मतदारसंघांत ११ ते १५ उमेदवार होते. २८८ मतदारसंघांत २६८ पुुरुष उमेदवारांनी बाजी मारली, तर मागील विधानसभा निवडणुकीत निवडून जाणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या केवळ २० इतकी होती.
एकूण ४११९ उमेदवारांपैकी ३४२२ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. त्यात ३१८५ पुरुष, तर २३७ महिला उमेदवारांचा समावेश होता. सहा राष्ट्रीय पक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यात बसपाच्या २८० पैकी सर्वाधिक २७५ उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली होती. सत्तेत आलेल्या भाजपच्या ४९ उमेदवारांना, तर शिवसेनेच्या १२९ उमेदवारांना अनामत रकमेवर पाणी सोडावे लागले होते.
यंदा सेना-भाजप युती आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत मिळत असल्याने उमेदवारांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची भीतीही राजकीय पक्षांतून व्यक्त केली जात आहे.
२०१४ ची विधानसभा निवडणूक
8,35,28,310
एकूण मतदार
5,26,91,758
मतदान केले
31110
टपाली मते ठरली अवैध
९० राजकीय पक्षांचा सहभाग
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत तब्बल ९० राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्यात ६ राष्ट्रीय पक्षांचा, तर २ प्रादेशिक पक्षांचा समावेश होता. याशिवाय, अन्य राज्यातील ७ राजकीय पक्षांचेदेखील उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांची संख्या ७५ इतकी होती. याशिवाय, अपक्ष उमेदवारांचीही संख्या लक्षणीय होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९७२ तृतीयपंथी मतदार होते.
त्यातील ३५७ तृतीयपंथीयांनीच प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला होता. त्यांच्या मतदानाची टक्केवारी ३७ टक्के इतकी राहिली. त्यावेळी एकूण ५ कोटी २६ लाख ९१ हजार ७५८ मतदारांपैकी २ कोटी ८३ लाख ८३ हजार ४ मतदार पुरुष, तर २ कोटी ४३ लाख ८ हजार ३९७ मतदार महिला होत्या. महाराष्ट्रात एकूण ९१ हजार ३२९ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली होती.
अनामत गमावलेले उमेदवार
भाजप २६० पैकी ४९
शिवसेना २८२ पैकी १२९
कॉँग्रेस २८७ पैकी १५२
राष्ट्रवादी २७८ पैकी ४१
मनसे २१९ पैकी २०९
माकपा २० पैकी १८
बसपा २८० पैकी २७५
भाकप ३३ पैकी ३३
सपा २२ पैकी २१
एमआयएम २४ पैकी १४