ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - शेतक-यांनी प्रदीर्घ काळ चालवलेल्या आंदोलनामुळे अखेर शेतक-यांपुढे सरकारनं नमतं घेत दूध दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र गाय आणि म्हशीच्या दुधाचे दर वेगवेगळे असणार आहेत. दुधाच्या नव्या दरांनुसार सध्याचा 24 रुपये लिटर असणा-या गाईच्या दुधाचा दर आता 27 रुपयांपर्यंत वाढणार असून, 33 रुपये लिटरनं मिळणारे म्हशीचे दूध आता 37 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दुधाचे नवे दर लवकरच लागू करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांकडून या नव्या दरानुसार खरेदी करणे दूध संघांना बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे. तत्पूर्वी 13 तारखेला दुधाचे नवे दर घोषित केले असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे राहील, असे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले होते. शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर वाढवले असले तरी सामान्य लोकांचाही सरकार विचार करत आहे. मध्यमवर्गीयांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. मात्र बळीराजाला आधार देण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असेही जानकर म्हणाले होते.
दुधाच्या खरेदी दरात 3 रुपयांची वाढ
By admin | Published: June 19, 2017 6:59 PM