जयंत धुळप / दि.३ (अलिबाग)
उडुपी मधील कुंदापूर तालुक्यांतील बसरुर मधील पोर्तुगीज-डचांची पाशवी सत्ता समूळ उखडून काढून, त्या सुभ्यास स्वातंत्र्य बहाल केले. श्री शिवप्रभुंच्या सागरी पराक्रमाच्या या तेजस्वी घटनेस येत्या ८ फेब्रुवारी २०१६ रोजी ३५१ वर्ष पुर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचा विजयोत्सव व सागरी सिमांचे संरक्षण करण्याचा संकल्प करुन सशक्त भारत निर्माणाकरीता ‘मराठा आरमाराची भरारी..करुया दर्यावर स्वारी..’या ध्येयाने शिवप्रेमी व शिव इतिहास समविचारींनी आयोजित केलेल्या ३ हजार ४१८ किमी प्रवासाच्या ‘तटीय भारत मैत्री अभियाना’चे बुधवारी सकाळी दहा वाजता सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची कर्मभूमी असलेल्या अलिबाग मध्ये आगमन झाले, त्यावेळी सरखेलांचे वंशज रघूजीराजे आंग्रे यांनी या अभियानाचे शानदार स्वागत केले.
३५१ वर्षापूर्वीची सागरी सुरक्षा निती, वर्तमान सागरी सुरक्षेत गरजेची
अथांग सागर धोकादायक आहे, स्वराज्याचे शत्रु समुद्रामार्गे येतात, सागरी आक्रमण सहजपणे मोडून काढण्यासारखे नाही, तेव्हा दर्यातून येणारा प्रत्येक शत्रु दर्यातच बुडविला पाहिजे या दुरदृष्टीने भारलेल्या श्री शिवप्रभुंनी आपले संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आरमार निर्माण केले. जलदुर्ग म्हणजेच आरमारी तळ उभारले. सिंधुसागरावरील विदेशी शक्तींच्या अर्निबध वावराला आळा घालण्यासाठी, आक्रमकांच्या मनात धडकी भरवणारी भगवी निशाणे फडकावीत डोलणा ऱ्या मराठी नौसेनेचा धाक निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग (मालंडची खाडी) ते उडुपीतील बसरुर अशी ही धाडसी आरमारी मोहीम ३५१ वर्षा पूर्वी यशस्वी करुन सागरी सीमा सुरक्षेचा पहिला वस्तूपाठ आपल्या नेतृत्व कुशलतेतून घालून दिला होता. त्यांची ही सागरी सुरक्षा निती तेव्हा पासूनच पूढे सुयोग्य प्रकारे जोपासली गेली असती तर नेमक्या त्याच सागराच्या सुरक्षे बाबत आज असणारी चिंता वर्तमानात राहीली नसती, आणि म्हणूनच आजच्या या अभियानास आगळे महत्व असल्याचे या मोहिमेच्या आयोजनात सक्रीय सहभागी झालेले सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघूजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आंग्रे समाधीस्थळी मोहिम शिलेदार नतमस्तक
‘तटीय भारत मैत्री अभियाना’चे मोहिम प्रमुख इतिहास अभ्यासक संदिप महिंद यांच्या नेतृत्वाखाली एकुण ९८ शिवप्रेमी युवक-युवती मोटरसायकल व अन्य वाहनांच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी झाले आहेत. अलिबाग शहरातील सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीस्थळी मोहिमेतील सर्व सदस्यांनी पुष्पांजली अर्पण करुन ते नतमस्तक झाले. यावेळी आरमाराच्या अनूशंगाने रघूजारीजे आंग्रे यांनी सर्व मोहिम शिलेदारांना मार्गदर्शन केले.
३१ जलदुर्ग, १० भुईकोट किल्ले, एक गिरीदुर्ग आणि ८ जंजि-यांचा अभ्यास
३० जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यानच्या या मोहिमेत एकुण ३१ जलदुर्ग, १० भुईकोट किल्ले, एक गिरीदुर्ग आणि ८ जंजिरे किल्ले यांना भेटी देवून मोहिम शिलेदार या सर्व किल्ल्यांची प्रत्यक्ष माहिती व इतिहास जाणून घेणार आहेत. 30 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील श्री वढू बुद्रुक येथून आरंभ झालेली ही मोहिम पुणे, डहाणु, शिरगांव, माहीम, केळवे, अर्नाळा, वसई, ससून डॉक (गेट वे ऑफ इडिया), अलिबाग, कुलाबा, चौल, रेवदंडा, कोर्लाई, मुरुड, पद्मदुर्ग, जंजिरा, श्रीवर्धन, वेश्वी, बाणकोट, हर्णे, सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, गोवा किल्ला, दापोली, दाभोळ, अंजनवेल, आंग्रेपोर्ट, जयगड, रत्नदुर्ग, पुर्णगड, विजयदुर्ग, देवगड, मालवण, सिधुदुर्ग, निवती, वेंगुर्ला, रेड्डी, यशवंतगड, तेरेखोल, खोजरुवे, कोलवाड थिवी, श्री सप्तकोटेश्वर, सांतिस्तेव, फोडा, मर्दनगड, बेतूल, खोलगड, कडवाड (कारवार), अंजदीव, अंकोला, मिर्जन, गोकर्ण, होन्नावर, श्री मुर्डेश्वर, भटकळ, कुंदापूर, उडूपी, बसरुर, सदाशिवगड, पणजी, शापोरा, अग्वाद, रेईश , मागोश, सावंतवाडी, राजापूर, संगमेश्वर, डेरवण, चिणळुण, महाड, रायगड किल्ला करुन १७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे पोहोचणार असल्याची माहिती महिंद यांनी दिली. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यास भेट देवून आल्यावर रघूजीराजे आंग्रे यांच्या घेरीया निवासस्थान परिसरात भोजन घेतल्यावर मोहिमेने रेवदंडा-मुरुडकडे कुच केले.