पुणे - विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत समर्थक आमदारांसह थेट सूरत गाठलं. या निवडणुकीत भाजपानं संख्याबळ नसताना पाचवा उमेदवार उभा केला होता. मविआतील आमदारांची नाराजी उफाळून येईल यासाठी उमेदवार दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. या निवडणुकीत भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आला. त्याचसोबत काँग्रेस-शिवसेनेची काही मते फुटली.
आता या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात विधान केले ते सध्या सोशल मीडियात बरेच व्हायरल होत आहे. मिटकरी म्हणाले की, विधान परिषदेच्या आता निवडणुका झाल्या. एका पक्षाची तीन मते फुटली. एका मताला २१ कोटी रुपये दिले. मग २७ मते द्यावी लागतात. २७ गुणिले ३ मी गुणाकार केला १६१ कोटी झाले. आपल्या जमिनीची किंमत ५ लाख एकर आहे. ४ एकर विकल्यावर २० लाख येतात. पैशांचा घोडेबाजार विधान परिषद निवडणुकीत झाला. आमच्याकडे ऑफर आहे, या गटाचे अध्यक्ष व्हा, एक मर्सिडीज घ्या, २ लाख रुपये महिना घ्या आणि २ कोटी नगदी घ्या. सध्याच्या श्रीमंत निवडणुकीत विधान परिषदेसारख्या सभागृहात मला एकही रुपया खर्च न करता आमदार होता आला ते केवळ अजित पवार यांच्यामुळेच झाले असं त्यांनी सांगितले.
नेमकं मिटकरींचे गणित चुकले आणि विरोधकांनी त्यांना ट्रोल केले. माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मिटकरींच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, जागतिक गणित तज्ञ म्हणून अमोल मिटकरी यांची नोबेल पारितोषिकसाठी राष्ट्रवादीकडून नाव जाहीर असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?राज्यातील २ मंत्र्यांचे सरकार लवकरच कोसळेल. कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते असते पण मध्यवर्ती निवडणूका जर लागल्या तर पांडुरंगाची पुजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार करतील. इतक्या ताकदीचे ते नेते आहेत. एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांच्या मनातील खदखद समजून घ्या, त्यांच्या एकट्याच्या मनातील सल नाही. अख्ख्या भाजपाच्या मनातील ही सल आहे. तुमचं नेतृत्व भाजपाला मान्य नाही हे परत एकदा सिद्ध झालंय अजूनही सावध व्हा असं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.