मुंबई - ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय घरगुती संबंध आहेत. त्याची पत्नी फडणवीसांना राखी बांधते. समित कदम हे फडणवीसांच्या खूप जवळचे आहेत. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही तरीही फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली असं सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांनी ठाकरे पिता पुत्र, अजित पवार यांच्यासह इतरांवर खोटे आरोप आणण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला असा आरोप केला. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, समित कदम इतका जवळचा माणूस आहे त्यामुळे सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली. मिरज, सांगली भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध हे कुणीही सांगितले. माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं त्यांनी सांगितले.
तसेच जर मी त्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर आज उद्धव ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेला खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं असतं. लहान मुलांनाही घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा यांनी प्रयत्न केला. एकतर जेलमध्ये जा, नाहीतर भाजपात या असं यांचे धोरण होते. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यात आला तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला, तिसरा प्रयोग अजित पवारांवर आणि तो यशस्वी झाला असा दावाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान, बात निकलेगी तो दूर तक जायेगी, सर्वकाही हळूहळू बाहेर येईल. मी योग्य वेळी सर्व बाहेर काढेन, मी धमकीला घाबरत नाही. समित कदमला मी कधीही पाहिलं नव्हतं. मी गृहमंत्री असताना रोज २०० लोक घरी भेटायला यायचे, मंत्रालयात अनेकजण भेटायचे. समित कदम हादेखील मला भेटला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडून आलोय असं सांगितले, त्यावेळी मी त्याला भेटलो तेव्हा हे सर्व सांगितले असंही अनिल देशमुखांनी म्हटलं.
ठाकरेंवर कोणते खोटे आरोप करायला सांगितले?
उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री म्हणून मला बोलावलं, त्यांनी महापालिकेसाठी आम्हाला पैशांची गरज आहे तुम्ही ३०० कोटी जमा करून द्या असं मला सांगितल्याचा खोटा आरोप मला करायचा होता. तर दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप लावणं याप्रकारचे खोटे प्रतिज्ञापत्र मला समित कदमने दिले. त्याच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत ५-६ वेळा बोलले. मात्र अनिल देशमुख असे खोटे आरोप कुणावर करणार नाही. तुम्ही ज्या खालच्या प्रकारचं राजकारण करताय हे महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही असं मी देवेंद्र फडणवीसांना फोनवर बोलल्याचा दावा देशमुखांनी पत्रकार परिषदेत केला.