सांगली : मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दस-यानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याच्या दर स्थिर असले तरी अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. दस-याला दोन ते अडीच हजारांवर दुचाकी, तर साडेपाचशेवर चारचाकी वाहने नव्याने रस्त्यावर आली. सांगलीच्या बाजारपेठेत अंदाजे ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.बाजारपेठेला ख-या अर्थाने सावरणा-या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणा-या दसरा सणाला यावर्षी चांगल्या खरेदीचा अंदाज होता. नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीच्या झळ्या सहन करणा-या व्यावसायिकांना दस-याने थोडाफार दिलासा दिला. खरेदीमध्ये सोने- चांदी, दुचाकी वाहने, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप आणि घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना जास्त मागणी होती. दसरा सणाला सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. सध्या सोन्याच्या भाव स्थिर असले तरी म्हणावी तितकी गर्दी सराफ पेठेत दिसत नव्हती. सराफ पेठेत अंदाजे दोन कोटीची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही उलाढाल कमीच म्हणावी लागेल.दसरा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी सुलभ कर्जपुरवठा केल्याने मोटारसायकलींच्या, चारचाकींच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. दुचाकींमध्ये गिअरच्या आणि गिअरलेस अशा दोन्ही प्रकारांतील जवळपास दोन ते अडीच हजार गाड्यांची विक्री झाली. तसेच अनेक ग्राहकांनी दस-याच्या मुहूर्तावर बुकिंग करून दिवाळीला वाहन ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच शेती मशागतीसाठी लागणारे लहान ट्रॅक्टर्स, इतर अत्याधुनिक अवजारांचीही चांगली विक्री झाली.चारचाकी गाड्यांच्याही समाधानकारक विक्री झाली आहे. मारुती व नेक्सा कंपनीच्या ३८८ गाड्यांची विक्री झाल्याचे चौगुले इंडस्ट्रिजचे सीनियर सेल्स मॅनेजर नीलेश पोतदार यांनी सांगितले. तर कंपन्यांच्या गाड्यांची ब-यापैकी विक्री झाली असून अंदाजे ५५० हून अधिक चारचाकी वाहने दस-यादिवशी रस्त्यावर आली आहेत. वित्तीय कंपन्यांकडून दहा हजारावरील कोणत्याही मोबाईलच्या खरेदीसाठी फायनान्स उपलब्ध करून दिल्याने, ज्या ग्राहकाचा किमान दहा हजाराचा मोबाईल खरेदीचा इरादा होता, त्याने थेट 20 हजारांपर्यंतचा मोबाईल खरेदी केला. दहा हजाराच्या पुढील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनाही ही सुविधा उपलब्ध होती.
सांगलीत दस-यादिवशी ३० ते ३५ कोटींची उलाढाल, चारचाकी वाहनांसह टीव्ही, मोबाईल खरेदीकडे ग्राहकांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 5:26 PM