सुरेश लोखंडे, ठाणेउत्तम दर्जाच्या भेंडीचे उत्पादन करणाराजिल्हा म्हणून नावारूपाला येत असतानाच आता ठाणे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवण्यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या ३०कंपन्या लवकरच स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आतापर्यंत ७४० शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दलालमुक्त आणि आडतेमुक्त होण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन उत्पादन परदेशात पाठवण्याचे नियोजन केले जात आहे. शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांतील हवामान व माती भेंडीसाठी उत्तम आहे. याशिवाय, भेंडीला देशातील सर्वच राज्यांतून मागणी आहे, पण जागतिक पातळीवरील आखातासह अन्यही देशांत शहापूर व मुरबाडमधील भेंडीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. यामुळे या भेंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात ३० कंपन्या उभ्या करण्यात येणार आहेत. यातील सुमारे आठ कंपन्यांची नोंदणीही झाली असल्याचे जंगटे यांनी सांगितले.शहापूर व मुरबाडमध्ये एक हजार १०० एकरांवर भेंडीचे पीक घेतले जाते. त्यातील बहुतांशी भेंडी आखाती देशांसह युरोपात निर्यात केली जाते. भेंडी निर्यातीत जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी या उत्पादक शेतकऱ्यांना कंपन्यांमध्ये विभागले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मँगोनेट, व्हेजनेट व फायटोसॅनिटरी अॅथॉरिटीच्या बळकटीकरणाद्वारे निर्यातीस प्रोत्साहन मिळत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी ही योजना लागू झाली आहे. त्याद्वारे भेंडीची निर्यात करण्यासाठी निवड झाली आहे. या ३० कंपन्यांद्वारे २३० हेक्टर शेतजमिनीवर भेंडीचे दर्जेदार पीक घेण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. शेती, कुशल मजूर, मुबलक पाणी आणि पोषक हवामानाची नैसर्गिक देणगी या दोन तालुक्यांना मिळाली आहे. यासाठी बी-बियाणे, कीटकनाशक, कीड व रोगमुक्त भेंडीच्या उत्पादनाची हमी असल्यामुळेच कृषीविभाग या शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमध्ये समाविष्ट करीत आहे. कमी उत्पादनात त्यांना जास्त पैसा मिळणार आहे.
भेंडी उत्पादकांच्या ३० कंपन्या
By admin | Published: April 04, 2016 3:03 AM