नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडी तालुक्यातील पिळंझे येथील चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून मागील अनेक वर्षांपासून अन्याय व अत्याचार होत असल्याचे भीषण वास्तव समोर आल्या नंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे तर दै . लोकमतने देखील या अन्यायाची दाहकता सर्वांसमोर आणली आहे. त्यानंतर आता शासकीय यंत्रणा जाग्या झाल्या असून पिळंझे चिंचपाडा येथील आणखी ३० आदिवासी बांधवांना सावकारी वेठबिगरीतून मुक्त करण्यात आले आहे.
भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी सोमवारी या ३० आदिवासी बांधवांना बंधबिगारी मुक्तीची प्रमाणपत्र वितरित केली आहेत. विशेष म्हणजे या आदिवासी बांधवांना सावकारी पाशात अनेक वर्षांपासून अडकवणारे कथित सावकार राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील ( दोघे रा पिळंझे ) यांच्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात बंधबिगरी , मारहाण , महिलांवर अन्याय अत्याचार , मारहाण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र या दोघा कथित सावकार आरोपींना अटक करण्यात पोलीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत. या दोन्ही आरोपींवर राजकीय वरदहस्त असल्यानेच पोलीस त्यांना अटक करत नासल्याची चर्चा देखील आता सर्वत्र सुरु आहे.
पिळंझे चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांना मागील २५ ते ३५ वर्षांहून अधिक काळ आपल्याकडे वेठबिगारी मजूर म्हणून अडकवून ठेवले होते . पती पत्नी अशा दोघांना आठवड्याला केवळ पाचशे रुपये मजुरीवर या मजुरांना हे सावकार राबवून घेत होते . त्याच बरोबर मजुरांना मारझोड तर महिलांवर अन्याय अत्याचार सारखे कृत्य देखील या सावकारांनी केल्याचे समोर आले आहे. या आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून होणाऱ्या अन्यायाची दाहकता दैनिक लोकमतने सर्वांसमोर आणल्या नंतर वर्षानुवर्षे सावकाराच्या वेठबिगारीत अडकलेल्या आदिवासी बांधवांना दै लोकमतने धीर देत त्यांना अन्यायाविरोधात बोलते केले . त्यानंतर या सावकारांनी मागील अनेक वर्षांपासून आपल्यावर केलेल्या अन्यायाची आपबिती पोलिसांसमोर कथक केली असता वर्षानुवर्षे आदिवासी बांधवांवर केलेल्या अन्यायाविरोधात दोघा सावकारांवर गणेशपुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबरोबरच बंधबिगारी उच्चटन अधिनियम कलमांतर्गत गणेशपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र हे दोघेही आरोपी अजूनही फरार असल्याने आम्हाला अजूनही खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही अशी प्रतिक्रिया बांधबिगरीतून मुक्त झालेल्या आदिवासी बांधवांनी दिली आहे.